साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवणी (डिस्टीलरी) ६० केएलपीडी विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन
बीड, दि. 8 -साखर कारखान्यांनी कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे. कारखान्यांनी उसापासून साखरेसह इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. तसेच, कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे, त्याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज केले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवणी (डिस्टीलरी) या ६० किलो प्रति दिवस क्षमता असलेल्या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, येडेश्वरी साखर कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे, ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.महादेव महाराज बोराडे, माजी आमदार अमरसिंह पंडित आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
बीडसह 10 जिल्ह्यात ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी 41 ठिकाणी संत भगवानबाबा वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था होणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जवळपास 232 साखर कारखान्यांसाठी 9 ते 10 लाख मजूर ऊसतोडणी करतात. ऊसतोड मजुरांची पुढची पिढी चांगले जीवन जगू शकेल, यासाठी नुकतेच लोकनेते गोपिनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सुरू करण्यात आले आहे. या महामंडळासाठी साखर कारखाने व शासन यांच्याकडून जवळपास 200 कोटी रुपये रक्कम जमा होईल. हा निधी गरजवंतांच्या कल्याणासाठीच वापरला जाईल, याची काळजी घ्यावी. पर्यावरण, वन विभाग, शेतकरी बांधव व इतर महामंडळांच्या माध्यमातून त्या त्या समाजातील जनता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी, यासाठी काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी नववर्ष व पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परिसरातील सर्व उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत. ट्रान्सर्पोट सबसिडी व रिकव्हरी लॉस बाबत शासन मदत करेल. ज्या भागातील ऊसतोडणी व्हायची आहे, त्या ठिकाणी हार्वेस्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऊस उत्पादकांनीही पाणी उपलब्धतेनुसार ऊस लागवड करावी. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत, शून्य टक्के दराने पीक कर्ज अशी पावले उचलण्यात आली आहेत. शासनाने पायाभूत सुविधांसाठी जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, साखर कारखाना चालवण्यास कर्तृत्त्व आवश्यक आहे. येडेश्वरी साखर कारखान्याने गेल्या 9 वर्षात 3 दुष्काळांवर मात करून केलेली प्रगती लक्षणीय आहे. या कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील जनतेचे कल्याण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
अध्यक्षीय भाषणात जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील म्हणाले, साखर कारखाने त्या त्या भागातील विकासाची केंद्रे आहेत. साखर कारखान्यांनी सामान्य माणसाला शक्ती दिली. अर्थव्यवस्थेत ऊस उत्पादन, साखर कारखानदारीचे महत्त्व मोठे आहे. इथेनॉल निर्मिती कारखाने वाढू लागले आहेत. कारखाना स्थापनेपासून गेल्या 9 वर्षात येडेश्वरी साखर कारखान्याने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे, असे ते म्हणाले.
मराठवाड्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आगामी दीड ते दोन वर्षात छोटे मोठे प्रकल्प हाती घेणार असल्याचे सांगून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील म्हणाले, गोदावरी खोऱ्यातील अतिरीक्त 19 टीएमसी पाणी वापरास मंजुरी मिळाली आहे. गोदावरी खोऱ्यातील तूट अधिकाधिक भरून काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून, पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. वळण बंधाऱ्याच्या कामांना गती देण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी नियोजित 7 टीएमसी पाण्यापैकी आगामी 2 वर्षांत 4 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. तूट भरून काढल्यानंतर अतिरीक्त उपलब्ध पाणी गरजू बीड, लातूर जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुढील दीड ते दोन वर्षांत दुष्काळी भागातील चित्र बदललेले दिसेल, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, विकास कामांचा बॅकलॉग भरुन काढून बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीचे स्वप्न साकार होऊ शकते, याचा विश्वास आसपासच्या तालुक्यांना मिळाला.
यावेळी बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखान्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला.
कार्यक्रमास माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार पृथ्वीराज साठे, सय्यद सलीम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, महेबूब शेख, डॉ. नरेंद्र काळे, राजेश्वर चव्हाण, शिवाजी सिरसाट आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक कारखान्याचे संचालक भवर श्रीधर यांनी केले. सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले. तर आभार सूरज खोडसे यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत. मो 8411009377