परिपूर्ण आणि सन्मानजनक जीवनाच्या दिशेने…
जागतिक लोकसंख्या दिन विशेष
जगाच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, प्रजनन दरातील बदल, शहरीकरण आणि स्थलांतर याचा दूरगामी परिणाम पुढील पिढ्यांवर होणार आहे. साधनस्रोत, पर्यावरण, सामाजिक वातावरण या बाबीदेखील लोकसंख्येमुळे प्रभावित होत असल्याने त्यादृष्टीने लोकसंख्येचा विचार करणे आवश्यक आहे.
विसाव्या शतकाच्या मध्यापासून लोकसंख्या वेगाने वाढण्यास सुरूवात झाली. १९५० ते २०२० दरम्यान जगाची लोकसंख्या तिपटीने वाढली. २००० ते २०२० या कालावधीत जागतिक लोकसंख्या सरासरी वार्षिक १.२ टक्के दराने वाढली. मात्र आफ्रिकेतील ३३ आणि आशियातील १२ देशात ही दुपटीने वाढली.
१९७० च्या सुरुवातीस स्त्रियांना प्रत्येकी सरासरी ४.५ मुले होती; तर २०१५ पर्यंत, जगाची एकूण प्रजनन क्षमता प्रति स्त्री २.५ मुलांपेक्षा कमी झाली होती. मात्र १९९० मध्ये असलेले जागतिक आयुर्मान २०१९ मध्ये ६४.६ वर्षांवरून ७२.६ वर्षांपर्यंत वाढले. २०५० पर्यंत जगातील सुमारे ६६ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहणार आहे.
२०११ मध्ये जगाची लोकसंख्या ७ अब्ज झाली. या वर्षी, हा आकडा ८ अब्जांवर जाईल. आरोग्य सुविधांमुळे वाढते आयुर्मान, घटता मातामृत्यू आणि बालमृत्यू दर, विविध लशींचा विकास यामुळे यात सातत्य राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या लोकसंख्येचा विकास, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न आणि मनुष्यबळाचा विकास महत्त्वाचा ठरतो.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर संधी आणि सुविधांची समानता तसेच व्यक्तीच्या सन्मानाची निश्चितीदेखील तेवढीच महत्वाची आहे. त्यासाठी मूलभूत गरजांसोबत शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधादेखील प्रत्येकाला मिळतील असे प्रयत्न केल्यास ही लोकसंख्या विकासाला पूरक ठरू शकेल. याबाबतीत जागतिक पातळीवर असलेले क्षेत्रीय असंतुलन दूर करण्याचा प्रयत्नही या विषयाचा एक पैलू आहे.
लिंग, वांशिकता, वर्ग, धर्म, अपंगत्व आदी विविध घटकांवर आधारित भेदभाव, छळ आणि हिंसाचाराला रोखणे ही या विषयाची दूसरी बाजू आहे. वंचित घटकांचा विकास हा एकूणच समाज आणि देशाच्या विकासासाठी महत्वाचा असल्याने त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. आरोग्य सेवा, शिक्षण, गृहनिर्माण, स्वच्छता, पाणी, अन्न आणि उर्जेची उपलब्धता प्रत्येक क्षेत्राला लोकसंख्येला होणेही गरजेचे आहे.
माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक घटकांमध्ये गुंतणूक केल्यास जगातील मोठ्या आव्हानांचा सामना करता येईल आणि आरोग्य, सन्मान आणि शिक्षणाचा हक्क प्रत्येकाला मिळूवन देता येईल. ८ अब्जांच्या जगात प्रत्येकाचे हक्क अबाधित ठेवल्यास संपन्न आणि शांततापूर्ण विश्वाची कल्पना करता येईल.
वाढत्या लोकसंख्येला सन्मानाचे जीवन आणि व्यक्तीचे सक्षमीकरण अशा दोन स्तरांवर जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने विचार होणे आवश्यक आहे. नागरिकाला सक्षम करणे त्याच्या स्वावलंबनापुरते मर्यादित नसून देशाच्या आणि जगाच्या विकासासाठीदेखील महत्त्वाचे आहे. त्याच्या आरोग्याचा विचार सुदृढ समाज घडविण्याचा विचार आहे, त्याचे शिक्षण हे औद्योगिक प्रगतीची मुख्य अट असलेले कुशल मनुष्यबळ घडविण्याची महत्त्वाची पायरी आहे अशी भूमिका स्वीकारल्यास वाढती लोकसंख्या समस्या न होता विकासाला पूरक ठरू शकेल. हाच विचाराचा धागा घेऊन आज लोकसंख्या वाढीचा विचार करणे गरजेचे आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377