भुसावळ ६६० मेगावाट क्षमतेच्या वीज प्रकल्प संचाचे ‘बाष्पक प्रदिपन’ यशस्वीरीत्या संपन्न
भुसावळ – ३० : महानिर्मितीच्या दिपनगर भुसावळ वीज प्रकल्प १x६६० मेगावाट स्थापित क्षमतेच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित संच क्रमांक ६ चे ‘बाष्पक प्रदीपन’ ३० मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) अभय हरणे यांच्या हस्ते नियंत्रण कक्षातून कळ दाबून यशस्वीरीत्या बाष्पक प्रदिपन पूर्ण करण्यात आले. यावेळी मेसर्स भेल कंपनीचे महाव्यवस्थापक दिनेश जवादे, भुसावळ प्रकल्प आणि वीज केंद्राचे मुख्य अभियंते अनुक्रमे विवेक रोकडे, मोहन आव्हाड प्रामुख्याने उपस्थित होते.
महानिर्मितीचा ६६० मेगावाट क्षमतेचा चवथा संच
भुसावळ येथे महानिर्मितीचे ५०० मेगावाट क्षमतेचे दोन संच (संच क्रमांक ४ व ५) आणि २१० मेगावाट क्षमतेचा एक संच या मधून नियमित वीज उत्पादन सुरू असून त्यामध्ये आगामी काही दिवसांत भर पडून भुसावळ वीज केंद्राची स्थापित क्षमता १८७० मेगावाट इतकी होणार आहे. संच क्रमांक ६ चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम मेसर्स भेल कंपनी करीत आहे. महानिर्मितीचा ६६० मेगावाट क्षमतेचा हा चवथा संच आहे. यापूर्वी कोराडी येथे प्रत्येकी ६६० मेगावाटच्या तीन संचांतून वीज उत्पादन सुरू आहे. चंद्रपूर २९२० मेगावाट, कोराडी २१९० मेगावाट नंतर आता भुसावळ १८७० मेगावाट हे महानिर्मितीचे तिसरे मोठे वीज उत्पादन केंद्र म्हणून साकारणार आहे.
सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून या संच क्रमांक ६ ला माहे जून २०२३ मध्ये कार्यान्वित करण्याचे तसेच ऑगस्ट २०२३ मध्ये हा संच पूर्ण क्षमतेने वाणिज्यिक तत्वावर वीज उत्पादन करेल असे प्रकल्प अधिकाऱ्यांचे नियोजन आहे. भुसावळ प्रकल्पाचे अधिकारी-अभियंते-कर्मचारी-कामगार अथक परिश्रम घेत असल्याचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले.
नुकतेच २० फेब्रुवारी २०२३ मध्ये महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी भुसावळ प्रकल्प स्थळी पाहणी करून प्रगतीपर कामांचा आढावा घेतला होता आणि बैठक घेऊन कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश दिले होते. बाष्पक प्रदीपन यशस्वीरित्या संपन्न झाल्याने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी भुसावळ वीज प्रकल्पाचे सर्व अधिकारी-कर्मचारी आणि मेसर्स भेल कंपनी व अंतर्गत सर्व अधिकारी-कामगारांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उप मुख्य अभियंते आर.एम. दुथडे, संतोष वकरे, प्रशांत लोटके, मनोहर तायडे, अधीक्षक अभियंते महेश महाजन,किशोर शिरभैय्ये, मनिष बेडेकर,योगेश इंगळे,पराग आंधे, राजु अलोने,सुमेध मेश्राम,सुनील पांढरपट्टे, महेंद्र पचलोरे,अतुल पवार, एस. एस. देशपांडे, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे,कल्याण अधिकारी पंकज सनेर, सुधाकर वासुदेव प्रामुख्याने उपस्थित होते.
भुसावळ वीज प्रकल्प माहिती
भुसावळ वीज प्रकल्पाचा अंदाजित खर्च ४५५० कोटी इतका असून यासाठी २० टक्के भाग भांडवल राज्य शासनाने तर ८० टक्के ग्रामीण विद्युतीकरण कॉर्पोरेशन कडून कर्ज रुपात वित्तीय सहाय्य घेण्यात आले आहे. १२२.३६ हेकटर जमिनीवर हा प्रकल्प उभारला आहे. चिमणीची उंची २७५ मीटर असून सुमारे ९७०० मेट्रिक टन इतका कोळसा दररोज लागणार आहे. प्रकल्प कालावधी ४२ महिन्यांचा असून कोविड काळातील अडचणींमुळे दैनंदिन प्रकल्प कामकाजावर काहीसा विलंब झाला आहे.
महानिर्मितीची सांघिक सामाजिक बांधिलकी
प्रकल्प स्थळी २५०० मनुष्यबळ कार्यरत असून सुमारे ९०० स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत कामगारांना दोन वेळेचे मोफत भोजन प्रकल्प स्थळी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने कामगारांचा वेळ आणि आर्थिक बचत होऊन त्यांच्यामध्ये आनंददायी वातावरण आहे. तसेच १०० कामगारांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षित करण्यात आले आहे. भुसावळ प्रकल्पा लगतच्या २१ गावांसाठी १८.६४ कोटींच्या विकास कामांची तरतूद करण्यात आली आहे. फुलगांव आणि पिंपरी सेकम गावांसाठी पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377