कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यापासून बचाव करावयाचा झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्वत:चे रक्षण करुन इतरांचे संरक्षण करता येऊ शकते. कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेऊन स्वत:बरोबरच इतरांनाही सुरक्षित करा. लसीकरणामुळे कोरोना नियंत्रित होत असला तरी कोरोना होऊ नये यासाठी स्वत:सह, आपले कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांचे संरक्षण करण्यासाठी कामाच्या ठिकाणी, घरी आणि बाहेर जात असताना योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि हात वारंवार साबणाने धुणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे.
याबरोबरच आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर जीवनशैलीमध्ये बदल करून नियमित व्यायाम, योग्य आहार हे उत्तम पर्याय आहेत.
आपल्याकडे परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण बरेच आहे. सध्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरीयंटचा प्रभाव वाढताना दिसतो. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी आगमनासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. ओमायक्रॉनच्या अनुषंगाने विभागातील कोविड आरोग्य संस्था सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेऊन अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन सुविधांचा आढावा घेऊन सुस्थितीत कार्यान्वित ठेवण्याबाबत खात्री करण्यात आली. डॉक्टर्स व स्टाफ नर्स यांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.
‘त्रिसूत्री पालन’
कोरोना हद्दपार होईपर्यंत त्रिसूत्रीचे पालन करण्याची प्रत्येकाने सवय लावणे आवश्यक आहे. सण, उत्सव, लग्नसमारंभ, भाजीमंडई, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन करावे. कोरोना कालावधीत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे मोठे नुकसान झाले आहे. वयोवृद्धांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले. अजूनही मुले आणि वृद्धांवर घराबाहेर जाण्यावर बंधने आहेत. याचा विचार करुन सर्वांनी आपली जबाबदारी समजून कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पर्यटक पुन्हा पर्यटनासाठी सज्ज झाले होते. पुणे विभागातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी तुडुंब भरल्याचे दिसून यायला लागले होते. कोरोना लसीकरणाच्या दोन मात्रा घेतल्या म्हणजे फिरण्याची मुभा मिळाली या आविर्भावात पर्यटक सगळीकडे गर्दी करताना दिसत होते. ही बाब काहीशी चिंताजनकच आहे. परंतु पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार पर्यटनस्थळे, धरणे, गड-किल्ले, स्मारके, ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी पर्यटकांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
लसीकरणामुळे मला कोरोना होणार नाही या भ्रमात राहून चालणार नाही. पंढरपूर, आळंदी, भीमाशंकर, सिंहगड, शिवनेरी आदी स्थळांना भेटी देणारा युवा वर्ग आणि भाविक बेफीकिरीने वागताना दिसला. युवकांनी नियमांचे पालन तर करावेच त्याबरोबरच लसीकरण करुन घ्यावे. ‘मिशन युवा स्वास्थ्य’ अंतर्गत 18 वर्षावरील सर्व युवांना लसीकरण करण्यात येते. तर ‘हर घर दस्तक’ मोहिमेंअंतर्गत सर्व गाव कोरोनामुक्त होण्यासाठी घरोघरी जाऊन वयोवृद्ध, दिव्यांग तसेच आजारी व्यक्तींना लसीकरण करण्यात येते. सलग 75 तास लसीकरण मोहिमही राबविण्यात आली. त्यामुळे कोविड लसीकरणाचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला आहे. ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे त्यांनी दुसरी मात्राही विहित मुदतीत घेतल्यास कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य होईल.
’15 ते 18 वयोगट लसीकरण’
3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले आहे. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. कोविन पोर्टलवर 1 जानेवारीपासून नोंदणी सुरू असून 50 टक्के लस ही ऑनलाईन तर 50 टक्के थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. लसीकरणासाठी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र आवश्यक असणार आहे.
लसीकरण मोहिमेला सर्वांनी प्रतिसाद देऊन प्रत्येक कुटुंबातील पात्र व्यक्तीला तसेच आपल्या गावातील, घराघरातील व्यक्तींच्या लसीकरणावर लक्ष देणे, गावा-गावात लसीकरणाचे महत्त्व पोहोचवून त्यांनाही या मोहिमेत सामील करून घेणे ही युवा वर्गाची मोठी जबाबदारी आहे. त्यांनी स्वत:चे रक्षण तर केलेच पाहिजे, शिवाय कोरोना संदर्भात सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगिकारल्याच पाहिजेत. सध्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीही लशीच्या दोन मात्रा असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.
संपूर्ण लसीकरणाबाबत जागरुकता दाखविणे गरजेचे आहे. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे, सिनेमागृहे, नाट्यगृहात या युवा वर्गाकडून सध्या पुरेशी काळजी घेतली जात नाही, असे याठिकाणच्या भेटी दरम्यान हे दिसून आले. त्यासंदर्भात युवा वर्गाचे प्रबोधन होणे आवश्यक वाटते.
10 जानेवारीपासून लशीच्या दोन मात्रा झालेले फ्रंटलाईन वर्कर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व 60 वर्षावरील नागरिकांना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कोणत्याही शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाते. लसीकरण हा संरक्षणाचा प्रभावी उपाय आहे. कोरोना नियंत्रणासाठी पहिली मात्रा महत्त्वपूर्ण तर, पूर्ण नियंत्रणासाठी दुसरी मात्रा आवश्यक आहे. त्यामुळे लशीची एक मात्रा झाली असेल तर दुसरी मात्राही वेळीच घ्या व सुरक्षित व्हा! कोरोनापासून संपूर्ण बचाव करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घेऊन नियम पाळा व कोरोना टाळा.
.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377