आंतरराष्ट्रीय योग दिन
आपणा सर्वांना माहित आहे की, स्वस्थ राहण्यासाठी शरीर व मन निरोगी असायला हवे. शरीर व मनाची काळजी घ्यायला निरोगीपण जपायला भारतीय प्राचीन संस्कृतीतील आयुर्वेद व योग या शास्त्रांची आपणाकडे खाण आहे.
दरवर्षी दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून २०१५ पासून साजरा केला जात आहे. या वर्षी दिनांक २१ जून २०२२ रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्याने देशभरातील सर्व ठिकाणासह काही निवडक प्रसिद्ध स्थळावर विशेष स्वरुपात साजरा केला जाणार आहे. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य YOGA FOR HUMANITY हे आहे
योग शास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, थायरॉईड वृध्दी, मनोविकार इ. जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार नियमित योग करण्याने नियंत्रित किंवा कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोगमुक्त होण्यामध्ये मदत होते.
योग आहे तरी काय? संस्कृत युज्य (म्हणजे जोडणे) या धातूपासून योग शब्द तयार झाला आहे. ज्याव्दारे शरीर व मन (चित्त) निरपेक्षपणे जोडले जातात. योग: चित्तवृत्ती निरोध: अशी योग ची व्याख्या पातंजल योगसूत्रामध्ये आढळते. वाईट विचारांचा त्याग, अहंकारापासून मुक्ती आणि चित्त म्हणजे मन शुद्धी म्हणजे योग. योग म्हणजे शरीर व मनाचे ऐक्य, विचार आणि कृतींची जोड, मनुष्याचा निसर्गासोबत सौहार्दपणा, पूर्णत्वाने निवृत्ती व निरोगी आरोग्याचा पवित्र संगम होय. तसेच भगवत गीतेमध्ये योगसु कर्म कौशल्यम व समत्वं योग उच्च्यते या व्याख्यांनी योगाची महती वर्णन केली आहे.
म्हणूनच योग हा व्यायाम नसून वाईट विचारांपासून तसेच रोगांपासून परावृत्त होऊन सुखाव्दारे स्वास्थ संर्वधनाचा मार्ग आहे. योग चा उगम इ. सूपुर्व २ ते ३ हजार वर्षापूर्वी झालेला असून त्याचे शास्त्रशुध्द वर्णन महर्षि पतंजली यांनी योग सूत्रामध्ये केलेले आढळते. योग चा प्रचार व प्रसार करण्यासाठी महर्षी पतंजली सह महर्षी घेरंड, स्वामी स्व-आत्माराम, श्रीनिवास, शंकराचार्य, महर्षी दयानंद, स्वामी अरविंद, स्वामी विवेकानंद, अय्यंगार गुरुजी, बाबा रामदेव ई. योग गुरुंनी मोलाचा वाटा उचलला आहे. योग हा मनामध्ये चांगले विचार उत्पन्न करणे, आचरण शुध्द ठेवणे, श्वासावर नियंत्रण ठेवणे व शरीराची शिस्तबध्द व लयबध्द हालचाल करणे, ज्याव्दारे शरीर व मनास स्थैर्यप्राप्ती होऊन मोक्षाकडे वाटचाल करणे होय. सूर्यनमस्कार बारा स्थितीमध्ये सात प्रकारच्या योग आसनांचा समुदाय होय. यामुळे शरीराला बल, ऊर्जा, उत्साह कांती बरोबरच मनाला स्थैर्य प्राप्त होते. योग चा अभ्यास योग तज्ञाच्या मार्गदर्शनाने करावा.
योग करण्याची पूर्व तयारी :-
१. शुचिर्भूत म्हणजे स्वच्छता , अंर्तबाह्य, ती परिसर, शरीर व मनाची.
२. शांत वातावरण आणि शरीर व मनाचे शैथिल्य.
३. रिकाम्या पोटी अथवा एक ग्लास कोमट पाणी पिऊन.
४. मलमूत्र विर्सजन केलेले असावे.
५. चटई/ सतरंजी अंथरून आणि सैल सुती कपडे घालून असावे.
६. थकवा, आजारपणा, तीव्र तणाव असताना किंवा घाईगडबडीत योगिक क्रिया करू नये.
७. जीर्ण विकार वेदना, हद्यरोग, गर्भारपण किंवा मासिक पाळी असताना योग तज्ञाचा/ प्रशिक्षकाच्या सल्ल्याने योगिक क्रिया हे ही तितकेच महत्वाचे.
अष्टांग योग :-
१. यम २. नियम ३. आसन ४. प्राणायम ५. प्रत्याहार ६. धारणा ७. ध्यान ८. समाधी (बहिरंग व अंतरंग योग)
तसेच ढोबळ मानाने चार प्रकारात योग वर्गवारी केली आहे.
१. कर्मयोग –शरीर २. ज्ञान योग – मन ३. भक्तीयोग – भावना ४. क्रिया योग – ऊर्जा
योग करतांना :-
- प्रार्थनेने व ओंकाराने सुरूवात करावी, ज्याव्दारे मन शिथिल व वातावरण निर्मिती होते.
- योगिक क्रिया ह्या हळूवारपणे व ताणविरहीत कराव्यात. ज्यावेळी शरीर व मन दक्ष असावे.
- श्वास थांबून ठेऊ नये व नाकपूडीनेच श्वास घ्यावा, जोपर्यंत वेगळे सांगितले जात नाही तोपर्यंत
- शरीर जखडून ठेऊ नका किंवा अनावश्यक झटके देऊ नका.
- आपल्या क्षमतेइतकेच योग करावा. योग करताना नियमितपणा व सातत्य राखावे ज्याचा कालांतराने फायदा दिसून येतो.
- आणि हो योगिक क्रिया करताना रेडिओ, टीव्ही, टेप, मोबाईल वरील गाणे ऐकू नयेत.
योग क्रियानंतर :-
१. योग क्रियेच्या अंदाजे २० मिनिटानंतर स्नान व नाष्टा करावा.
२. आहार सात्विक व शाकाहार असावा.
अष्टांग योग :-
बहिरंग योग
1) यम :- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचैर्य, अपरिग्रह हे आचरणात आणावे.
2) नियम :- वैयक्तिक स्वास्थ्यासाठीचे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान.
3) आसन :- कुर्यात तद् आसनम् स्थ्यैर्यम :
ज्या स्थितीमध्ये शरीराला कष्ट न देता सुखाने स्थिर बसून मनाला सुखाची अनुभुती येते ते आसन. ढोबळ मानाने चार स्थितीमध्ये आसनांची विभागणी करू या.
बैठे स्थितीतील आसन :- पद्मासन, वज्रासन, पर्वतासन, भद्रासन, वक्रासन, अर्धमच्धेंद्रासन, अर्धउष्ट्रासन, योगमुद्रा इ.
उभे स्थितीतील आसन :- ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन इ.
पाठीवर झोपून (उताणे) :- हलासन, चक्रासन, पवनमुक्तासन, शवासन, सर्वांगासन इ.
पोटावर झोपून (पालथे) :- मकरासन, भुजंगासन, शलभासन, नौकासन, धनुरासन इ.
4) प्राणायाम :-
प्राणायम हा वज्रासन पद्मासन अगर सुखासन मध्ये डोळे मिटून बसावे. यामध्ये श्वास व उच्छ्वास या प्राणावर नियमन व नियंत्रण केले जाते. त्याचवेळी पूरक कुंभक रेचक केला जातो. यात प्रामुख्याने सूर्यभेदी, उज्जायी, शीतली, सित्कारी, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्च्छा, प्लाविनी, अनुलोम-विलोम, नाडी शुद्धी, कपालभाती इ. चा समावेश होतो.
अंतरग योग :-
5) प्रत्याहार :- बुध्दीव्दारे योग विचारकरून कार्य करणे आणि इंद्रियावर नियंत्रण असणे.
6) धारणा :- मनाला विशिष्ठ स्थानावर स्थिर करण्याची साधना म्हणजे धारणा.
7) ध्यान :- साधकाने एका विशिष्ट वस्तूवर चित्त एकाग्र केले असेल त्याचठिकाणी त्याची एकाग्रता करून चिंतन करणे म्हणजे ध्यान. हे अनेक प्रकाराने केले जाते.
8) समाधी :- सर्व वृत्तींचा निरोध म्हणजे समाधी. योगाची अंतिम अवस्था कैवल्य प्राप्ती होय. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळल्यानंतर पाण्याच्या एकत्वला प्राप्त होते, तद्वतच मन वृत्तीशून्य होऊन आत्म्याच्या एकत्व ला प्राप्त होते, ती अवस्था म्हणजे समाधी होय.
याबरोबर शुद्धीक्रिया जसे धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली व कपालभाती योग तज्ञांच्या सल्ल्यानुसार लाभदायक ठरतात. तसेच बंध व मुद्रा चा पण अभ्यास केला जातो.
योग अनुसरण्याचा लाभ :-
योग च्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच रोगी रोगमुक्त होतात आणि सकारात्मक ऊर्जा कार्यरत राहते.
शरीराला दृढता व स्थिरता प्राप्त होते. मन विषयांपासून परावृत्त होते. चैतन्य व उत्साह राहतो.
उ~ सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया : सर्वे: भद्रा णि पश्यन्तु, मा कश्चिदु:खभाग्भवेत् I
उ~ शान्ति: शान्ति: शान्ति: II
-वैद्य व्यंकट धर्माधिकारी एम.डी. (आयुर्वेद)
सहाय्यक संचालक आयुष पुणे तथा
आयुर्वेद विभाग प्रमुख ससून रुग्णालय पुणे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377