आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
क्रीडा व मनोरंजन
Trending

२१वी छत्रपती शिवाजी महाराज वरिष्ठ गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा – जळगांव – २०२३.

पुणे, मुंबई शहर यांची महिलांत, तर मुंबई शहर,  अहमदनगर यांची पुरुषांत विजयी सलामी.

मुंबईच्या विजयात सुशांत साईलचे एकाच चढाईत ४ गडी टिपले.

 जळगाव,दि.11:- पुणे, मुंबई शहर यांची महिलांत, तर मुंबई शहर,  अहमदनगर यांची पुरुषांत “२१व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक” कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबईच्या विजयात सुशांत साईलचे एकाच चढाईत ४ गडी टिपले.  जळगांव येथील सागर पार्क मैदानात आजपासून मॅटवर सुरू झालेल्या महिलांच्या अ गटात पुण्याने नागपूरला ६६-२२ असे पराभूत केले. पहिल्या डावात ४लोण देत ४३-०७ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने दुसऱ्या डावात आपल्या बदली खेळाडूंना संधी दिली. निकिता पडवळ, आम्रपाली गलांडे , पूजा शेलार यांचा चतुरस्त्र खेळ पुण्याच्या विजयात महत्वाचा ठरला. नागपूरची तनुश्री ठाकरे चमकली. 

महिलांच्या ब गटात मुंबई शहरने श्रद्धा कदम, पूजा यादव यांच्या झंजावाती चढाया, मेघा कदम, पौर्णिमा जेधे यांचा भक्कम बचाव यांच्या जोरावर अमरावतीला ६६-१२ असे सहज नमविले. पूर्वार्धात ३ लोण देत ३६-०४ अशी आघाडी घेणाऱ्या मुंबईने उत्तरार्धात देखील ३लोण देत ५४गुणांच्या फरकाने हा विजय साकारला. अमरावतीची श्रावणी लाड बरी खेळली. पुरुषांच्या अ गटात मुंबई शहरने अमरावतीला ७१-२७ असे लोळवीत साखळीत पहिला विजय नोंदविला. प्रणव राणे, सुशांत साईल यांच्या धुव्वादार चढाया त्याला संकेत सावंत, हर्ष लाड यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे मुंबईने दोन्ही डावात ३-३ लोण नोंदविले. अमरावतीच्या अंकुश लाड, अभिषेक राठोड यांनी बऱ्यापैकी लढत दिली. पुरुषांच्या ब गटात अहमदनगरने मध्यांतरातील १७-२७ अशा १० गुणांच्या पिछाडीवरून वाशीम संघाचा कडवा प्रतिकार ५०-४२ असा मोडून काढला. आकाश चव्हाण, अब्दुल शेख यांनी उत्कृष्ट खेळ करीत वाशीम संघाला विश्रांतीला आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते. पण उत्तरार्धात नगरच्या आदित्य शिंदे, शिवम पठारे यांनी चढाईचा तुफानी खेळ करीत ३लोण देत विजयश्री खेचून आणली. त्यांना अजित पवारने भक्कम पकडी करीत उत्तम साथ दिली. उत्तरार्धात वाशीम संघाचा खेळ ढेपालला. 

   या स्पर्धेत सामन्यांना प्रथम सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचे उदघाटन क्रीडामंत्री गिरिषभाऊ महाजन व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उवस्थितीत करण्यात आले. 

१)मुंबई शहराचा प्रणय राणे हनुमान उडी मारून अमरावती संघाचा गडी टिपताना.

छायाचित्र:- दिनेश घाडीगांवकर.

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!