आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

‘दर्पणदिन’ निमित्त विशेष लेख

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आज या घटनेस 190 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महत कार्याची आठवण आपणास रहावी म्हणून प्रतिवर्षी 6 जानेवारी रोजी राज्यात ‘दर्पण दिन’ साजरा केला जातो.

दर्पण परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र

बाळशास्त्रींनी त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करून घेतला आणि दर्पणरुपी ज्योत समाजप्रबोधनासाठी तेवत ठेवली. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. 25 जून 1840 यावर्षी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तपत्राची निर्मितीच नव्हे तर समाजसुधारणेचे कार्यही बाळशास्त्री जांभेकरांनी केले. किंबहुना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत ते आग्रही होते. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे त्यांचे मत. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रासारखी मोठी शक्ती आहे. तिचा उपयोग समाजात बदलासाठी होऊ शकतो. याचा त्यांना अभ्यास होता. त्यामुळेच बाळशास्त्रींनी तत्कालीन चुकीच्या रुढी परंपरांवर प्रहार केला. धार्मिक व सामाजिक सुधारणांबाबत बाळशास्त्री जांभेकर हे प्रगमनशील व्यवहारवादी होते. म्हणूनच त्यांनी दर्पणला समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले.

विविध ग्रंथसंपदा

वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. मुंबईत इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन त्यांनी विविध विषयांचे ज्ञान मिळविले. या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. जांभेकरांनी सतत परिश्रम करुन त्याकाळच्या जवळपास नऊ देशी-विदेशी भाषा आत्मसात केल्या होत्या.

दर्पण

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते, असे सुप्रसिध्द माध्यम तज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे. त्यानुसार आचार्य जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. 1832 चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी दर्पण सुरु केले. ‘दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: इंग्रजी मजकूराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ मधील मजकूराचा दर्जा उच्च होता.

भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान 1834 यावर्षी बाळशास्त्रींना मिळाला. पुढे ते 1845 यावर्षी ते शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल,इतिहास, भौतिकशास्त्र, गणित,  खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत. एलफिन्स्टनकृत हिंदुस्थानाच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ 1851 यावर्षी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. बाळशास्त्री त्यांच्या विद्यार्थीयांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचा शिष्यांच्या यादीत दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी, नारायण दाजी, प्रा. केरो लक्ष्मण छत्रे, डॉ. आत्माराम पांडूरंग, नाना नौरोजी, नौरोजी बेहरामजी, रामचंद्र बाळकृष्ण, वासुदेव पांडूरंग, अर्देसर फ्रान्सिस मूस, दफ्तदार केशवराव नरसिंह आदी मान्यवरांचा समावेश आहे.

बोलके नव्हे कर्ते

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसार यासाठी केलेले कार्य हे अलौकिक असे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स कॉर्नोक यांनी 1840 यावर्षी जस्टीस ऑफ पीस अशी पदवी देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला. आज वर्तमानपत्राची भव्यता पाहता झालेली प्रगती लक्षात येते. परंतु त्याकाळी अत्यंत बिकट स्थितीमध्ये वर्तमानपत्र चालविण्याचे कार्य आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती ना.ग.चंदावरकर यांनी म्हटले आहे की, “बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूतींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे. तर आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. मुंबई महानगरीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली, असेही आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे.

आद्य संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ अशा बहूआयामी व्यक्तीमत्वाचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याकाळी केलेल्या कष्टाची जाणीव निश्चितच आजची माध्यम क्रांती पाहून होते. त्यांच्या या महान कार्यास शतश: प्रणाम…

courtesy – डॉ.राजू पाटोदकर उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणे

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!