आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

९० टक्के सबसिडीवर ओबीसी व ओपन गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू

खऱ्या पशुपालकांचा रोजगार बळकट करण्याचा आनंद : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

नागपूर,दि.4 : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी जिल्हा स्तरावर अनेक योजना आहेत. मात्र परंपरेने गोपालक असणाऱ्या इतर मागास वर्गीय (ओबीसी) व सर्वसामान्य गटातील (ओपन) पशुपालकांचा रोजगार बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पुढाकार घेतला आहे.  नागपूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत आज त्यांच्याहस्ते 950 गाय गट व 1360 शेळी गट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका शानदार सोहळ्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे प्राप्त निधीमधून 90 टक्के अनुदानावर ही मोहीम राबविली जाणार आहे. आजपासून या मोहिमेचा शुभारंभ झाला असून या मोहिमेअंतर्गत खात्रीलायक दहा लिटर दूध देणाऱ्या साहिवाल, गीर, राठी, सुरती, महेसाणा आदी प्रजातीच्या गाईंचे वाटप केले जाणार आहे. तर शेळी गटांमध्ये संगमनेरी, उस्मानाबादी, जमनापुरी बकऱ्यांचा पुरवठा केला जाणार आहे.

कळमना येथे आज झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेअंतर्गत निवड समितीमार्फत निवडण्यात आलेले गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील सहा महिने याठिकाणावरुन निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादारांमार्फत निर्धारीत प्रजातीच्या गायी आणि बकऱ्यांचा पुरवठा केला जाणार आहे. पुरवठा करण्यात येणाऱ्या गायी व बकऱ्या यांचा विमा काढण्यात आला असून खरेदीपासून 30 दिवसांपर्यंत जनावर दगावल्यास नवीन जनावर देण्यात येणार आहे. विक्री करण्यात येणाऱ्या सर्व गायी व बकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी पदुंम विद्यापीठ जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे तज्ज्ञ कार्यरत आहेत.

आज सकाळी कळमना येथील बाजार समितीच्या आवारात अन्य राज्यातून व विविध ठिकाणावरुन आयात करण्यात आलेल्या गुरांना विक्रीसाठी सज्ज करण्यात आले होते. सकाळी काही वेळ खरेदी विक्री सुरु होती. ना.सुनील केदार याठिकाणी आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, सभापती तापेश्वर वैद्य, उज्वला बोढारे, नेमावली माटे, भारती पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, उपसभापती प्रकाश नागपूरे, दूधराम सव्वालाखे, अवंतिका लेकुरवाडे, महाराष्ट्र पशुसंवर्धन विद्यापीठाचे अधीष्ठाता डॉ. आशिष पातुरकर, डॉ.मंजुषा पुंडलिक, जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी शिला बनकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी संबोधित करताना सुनील केदार यांनी आजचा दिवस क्रांतीकारी असून नागपूर जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य जिल्ह्यातही अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आतापर्यंत जेव्हांही दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला, त्यावेळी पशूधन शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले आहे. शेतकऱ्यांनी पशूधनाचा योग्य सांभाळ करण्यासोबतच त्यांचा विमा काढण्याचा योजनेकडे देखील लक्ष वेधावे. शेळी, मेंढी, कोंबडी पर्यंत सर्वांचाच विमा काढला जातो. विमा संदर्भात कोणताही तंटा निर्माण झाल्यास गावपातळीवर समितीमार्फत सोडविल्या जाऊ शकतो. महाराष्ट्रात विविध योजना पशूसंवर्धन विभागात आहे. राष्ट्रीय गोकुल अभियानाअंतर्गत दोनशे गायींचा गट, राष्ट्रीय पशूधन अभियानाअंतर्गत पाचशे शेळांचा प्रकल्प, एक हजार कोबंड्याचा प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांकडे लक्ष वेधने आर्थिक व सामूहीक हिताचे ठरणारे आहे. आज महाराष्ट्रात दरदिवशी अन्य राज्यातून एक कोटी अंडी आयात करावी लागते. त्यामुळे कुक्कुटपालन किती मोठा व्यवसाय आहे हे लक्षात येईल. परंतू योजनेचा लाभ घ्यायचा त्यासाठी पुढे पुढे करायचे व नंतर पिंजरे खाली ठेवायचे, हे चालणार नाही. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या नव्या योजनेत ज्यांना गोपालन, गौरक्षण, दुधाळ जनावरांचे संगोपन आणि दुधाच्या व्यवसायाची जाणीव आहे. अशाच लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे धोरण अवलंबविले आहे. यातून गरजूंना रोजगार निर्मिती व्हावी हेच धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पशूसंवर्धन विभागामार्फत नवनव्या योजना राबविण्यासाठी केंद्रशासनाकडे देखील प्रस्ताव टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर येथे मंडईमध्ये बकरा मार्केट लावून दुबईमध्ये बकरे पाठविण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गुरांच्या लसीबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला होता. जिल्हा परिषदेत कालबद्धमर्यादेत लसीकरण मोहीम गुरांसाठी आखली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या पशूसंवर्धन दवाखान्यामध्ये वाढ करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी संबोधित केले. राज्यात ओबीसी आणि ओपन मधील लाभार्थ्यांना वाटप होण्याचे हे पहिले उदाहरण असून जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. स्वयंरोजगार हा उद्देश या प्रस्तावाचा असून तो मान्य करण्यात यावा. तसेच गुरांचे कालबद्ध लसीकरण करण्याबाबत धोरण ठरावे, अशी मागणी केली. यावेळी सभापती तापेश्वर, वैद्य, दुधराम सव्वालाखे यांची समयोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.रेवसकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अभय भालेराव यांनी मानले. 

.

.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\