मुंबई, दि.17 :- शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ, गहू, हळद आणि गावरान कडधान्य, डाळी, असे पीक शेतकरी बांधव घेत असतात. या उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच ग्राहकांना योग्य दरात चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व तांदूळ उत्पादकांशी उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि सहकार मंत्री श्री. पाटील यांनी संवाद साधला. प्रत्येक स्टॉलवरील तांदळाची वैशिष्ट्ये जाणून घेतली. राज्याचे समृद्ध असे कृषी वैविध्य एकाच ठिकाणी पहायला मिळत असल्याबद्दलही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी समाधान व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड व ग्रोवर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ गुरुवार दि. 17 ते 19 फेब्रुवारी 2022 असे तीन दिवस असणार आहे. यामध्ये सेंद्रिय निळाभात, काळाभात, लाल तांदूळ (शुगर फ्री) इंद्रायणी, काळातांदूळ, कोलम, वाडा कोलम, झिनी कोलम, ब्राउन राईस, आंबेमोहोर, रायभोग, काळा गहू, नाचणी ,सेंद्रिय काजू, महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणारी उत्पादने यांचा समावेश आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber