आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन

मुंबई : “समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद नाटकांमध्ये असून महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीला नाटकांमधून विचारांचे बळ मिळाले असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचे’ राज्यस्तरीय उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, ज्येष्ठ रंगकर्मी नागेश भोसले आणि १९ केंद्रांमधील मान्यवर उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर कठीण परिस्थिती ओढावली होती, सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते; या सर्व पार्श्वभूमीवर राज्य नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करुन आनंद महोत्सव साजरा करीत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कला आणि कलावंतांशी जिव्हाळाचे नाते आहे. नाट्य कलेच्या माध्यमातून संस्कृती जतन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, बँका, दूधसंघामध्ये एक नाटक प्रयोग झाल्यास कलावंतांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी आणि समाजप्रबोधन करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ मिळेल  व यासाठी सहकार मंत्री यांनी सहकार्य करावे अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकार रंगभूमीला मिळाले असून यापुढेही हा ओघ कायम राहील असे  बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

रंगकर्मींसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यावर भर देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले, गेली सहा दशके राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. इतका काळ अविरतपणे सुरू असलेली आणि नाट्यकलावंतांना ऊर्जा देणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा आहे. कोविडच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली मात्र आता कोरोना साथ काही प्रमाणात नियंत्रणात आली असली, तरी अंतरनियमनासारखी काही पथ्ये आपल्याला पाळायची आहेत. याचे भान ठेवूनच ही हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. निर्बंधाखाली का होईना, ही स्पर्धा यंदा होत आहे याचा मनस्वी आनंद आहे.

समाजात काय घुसळण सुरू आहे, कोणत्या प्रकारचे विचारमंथन घडते आहे याचे दर्शन राज्य नाट्य स्पर्धा घडवत असते. समाजात जे सुरू आहे ते या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर सादर होत असते. या स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची शीर्षके जरी पाहिली तरी हे स्पष्ट होईल. शेकडो हौशी नाट्यसंघ, अनेक कलाकार, लेखक या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवंत कलाकारांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्याचे आम्ही ठरवले आहे. कलाकारांमध्ये व्यावसायिकता यावी, यादृष्टीने अशा कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास आहे. राज्य शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाट्य-कला क्षेत्रासाठी अनेक पातळ्यांवर कार्यरत आहे. येत्या काळात सिनेमा-नाटक-मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यास नाट्यकलावंताना शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ वाढेल, अशी आशा आहे. ही राज्य नाट्य स्पर्धा येता काही काळ नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री.देशमुख यांनी यावेळी केले.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या साठ वर्षांत नाट्य-कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे कलाकार राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आले आहेत. अशी ही महत्त्वाची स्पर्धा गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकली नव्हती. खरे तर कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे आपण एकप्रकारे कोंडून बसलो होतो. परंतु यंदा ही स्पर्धा होत आहे याचा आनंद आहे. स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांचा आस्वाद नाट्यरसिक मनमुरादपणे घेतील असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, नाट्य कलेचा प्रसार व्हावा या हेतूने राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ झाला. गेल्या साठ वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून तो हेतू प्रभावीपणे साध्य झाला आहे. कलाकारांसाठी महाराष्ट्र शासन निरनिराळे उपक्रम राबवत आहे. नाट्यप्रयोगांना अनुदान, नाट्य प्रशिक्षण शिबिर, वृद्ध कलावंतांना मानधन अशा विविध योजना सांस्कृतिक खात्यामार्फत राबविल्या जात आहेत. राज्य नाट्य स्पर्धा तर उदयोन्मुख कलाकारांसाठी मोठी संधी असते. या कलाकारांना नाट्यरसिकांनीही प्रोत्साहन द्यावे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. यड्रावकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य त्यांनी केले तर सह संचालक मीनल जोगळेकर यांनी आभार मानले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.

जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ९५० संघ/संस्था भाग घेणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!