समाजाच्या जडण-घडणीत ग्रंथ आणि ग्रंथालयांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्य शासन राज्यातील नागरिकांना ग्रंथालय सेवा देण्यास कटिबद्ध आहे.‘गाव तेथे ग्रंथालय’हे शासनाचे घोष वाक्य आहे. याच घोष वाक्यानुसार धुळे येथे भव्य-दिव्य ग्रंथ भवन आकारास आले आहे.त्या विषयी थोडे…
धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या काठावर उत्तरेच्या बाजूला असलेली पांढऱ्या शुभ्ररंगातील एक विस्तीर्ण इमारत अलिकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अगदी अमेरिकेच्या व्हाइट हाऊस सारख्या दिसणाऱ्या या इमारती जवळ गेले की या इमारतीची भव्यता आणखी मोठी होते.या इमारती चे नाव आहे ग्रंथभवन. अर्थात जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकाऱ्यांचे हे कार्यालय आणि ग्रंथालय. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हक्काची अभ्यासिका.
शासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षे शिवाय पर्याय नाही.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा असो,की अखिल भारतीय स्तरा वरील नागरी सेवा परीक्षा.अनेक तरुण- तरुणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करियर निवडीत आहेत.धुळे जिल्ह्यातून सन 2018 मध्ये एकाच वर्षी पाच जणांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमा तून घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेसाठी निवड झाली होती. त्यानंतर यंदा ही धुळे जिल्ह्यातील दोन तरुणांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे.त्यामुळे अनेक तरुण तरुणी स्पर्धा परीक्षा देताना दिसत आहेत.एवढेच नव्हे तर हे तरुण-तरुणी अभ्यासिका, ग्रंथालये, वाचनालयां मध्ये जावून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना दिसत आहेत.धुळे शहरातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. हे ग्रंथ भवनातून भविष्यात निश्चितच चांगले अधिकारी घडतील यात शंकाच नाही!
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथांची पुस्तकांची उपलब्धता व्हावी,त्याचबरोबर वाचन संस्कृती वृद्धिंगत होवून नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून राज्यशासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत.या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून धुळे येथे 1996 मध्ये धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची स्थापना झाली.सुरवातीला याकार्यालयाची इमारत भाडे तत्वावर होती. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून धुळे शहरात पांझरा नदीच्या काठावर ग्रंथालयाची प्रशस्त इमारत साकारली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून या ग्रंथालयासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च आला आहे.त्यासाठी तत्कालिन पालक मंत्री श्री दादाजी भुसे व तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या सह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे.
या ग्रंथालयात तळ मजल्यावर तीन आणि पहिल्या मजल्यावर तीन असे सहा कक्ष आहेत. त्यापैकी एका कक्षात सभागृह साकारले आहे. या सभागृहात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी स्वत:हून चालू घडामोडींवर आधारित विषयांवर गटचर्चा घडवून आणतात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुलभ अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एका वेळेस तब्बल साडेतीनशे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करु शकतात. पांझरा नदी काठावरील शांततामय वातावरणात अभ्यास करून अनेक तरुण- तरुणी आज शासनात विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यात तलाठ्यापासून पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
ग्रंथालयात येणाऱ्या अनेक तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे ते स्पर्धा परीक्षां साठी आवश्यक संदर्भ ग्रंथ किंवा पुस्तकांची खरेदी करू शकत नाही. तसेच या तरुणांना अभ्यासा साठी पोषक असे वातावरण घर किंवा घराच्या आजू बाजूला मिळू शकत नाही. त्यामुळे अशा अनेक तरुणांना ग्रंथालयाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रंथालयातील शांततामय वातावरणात स्पर्धा परीक्षा देणारे तरुण आपापल्या पाहिजे ते संदर्भ ग्रंथ,पुस्तके नि:शुल्क अभ्यासू शकतात. त्यामुळे ग्रंथ भवन हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
ग्रंथालयात 72 हजार ग्रंथ संपदा
धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालयातीलअभ्यासिका वर्षभर विद्यार्थ्यांसाठी खुली असते.या ग्रंथालयाने सुट्टी पाहिलेली नाही. सकाळी सात वाजल्या पासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत ग्रंथालयातील वर्दळ कायम सुरूअसते.या ग्रंथालयात विविध विषयांवरील तब्बल 72 हजारग्रंथ आहेत. त्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण- तरुणींसाठी 12 हजारांवर पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयातूनच पुस्तके घ्यायची आणि तेथेच वाचन करून अभ्यास,नोट्स काढायच्या असा दिनक्रम या ग्रंथालयात येणाऱ्यांचा आहे. या शिवाय ग्रंथालय येणाऱ्या दैनंदिन वाचकांची संख्या सुद्धा पाचशेच्या वरअसून 1568 ग्रंथालयाचे सभासदआहेत. या सर्व परिसरावर निगराणी ठेवण्यासाठी सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्हा शासकीय ग्रंथालयाने काळाची पावले ओळखत स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रंथालया तर्फे ई- बुक रिडर्सची सुविधा उपलब्ध आहे. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके उपलब्ध करून देण्यातआलीआहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यास मदत होतआहे.
या शिवाय धुळेजिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालया तर्फे सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणे, त्यांचे संघटन व विकास करणे, सार्वजनिक ग्रंथालयांना शासन मान्यता प्रदान करणे, तदर्थ व परीरक्षण अनुदान देणे, ग्रंथालय चळवळीच्या प्रोत्साहनार्थ योजना तयार करणे, जिल्हा, तालुका व ग्राम पातळी पर्यंत ग्रंथालय सेवांचे जाळे निर्माण करणे, शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासास उत्तेजन देणे, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनां द्वारे सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थ साहाय्य पुरविण्याचे देखील कार्य केले जाते.
“धुळे येथे जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी यांचे कार्यालय अर्थात ग्रंथ भवन इमारतीची निर्मिती झाली आहे. या इमारतीच्या देखभालीसाठी अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी ही सहकार्य करतात. तसेच या कामी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधा कृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.”– जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, धुळे |
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377