आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण

सर्पदंश : काळजी आणि उपचार

सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जीवाला धोका वाटला तरच स्वरक्षणासाठी ते दंश करतात. इतरवेळी ते मनुष्यापासून लांबच राहतात.

साप ही निसर्गाची एक सुंदर व अत्यंत उपयोगी रचना आहे. पण आपले समज, गैरसमज व भीतीमुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे.  शेतकऱ्यांचाच नव्हे, तर सर्व मानवजातीचाच मित्र असलेल्या सापांना संरक्षणाची खूप गरज आहे. पण त्यासोबतच सापापासून आपले संरक्षण व्हावे आणि सर्प दंशानंतर खबरदारी घेणेही महत्त्वाचे आहे.

सापांमध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी असे तीन प्रकार आढळतात. मुख्यत्वे नाग (कोब्रा), फुरसे, मण्यार, घोणस हे चार मुख्य विषारी साप आढळतात. साप  दिसला की त्याला मारायचे, हेच चित्र साधारण सर्वत्र दिसते. विषारी व बिनविषारी हा फरक समजून न घेता प्रत्येक साप विषारी आहे आणि जणू काही त्याचा जन्म माणसाचा जीव घेण्यासाठीच झाला आहे, असं समजून सापांची हत्या केली जाते.

सापांविषयी माहिती करून घेतल्यास आणि त्यांना न मारता सर्पमित्रांच्या सहाय्याने त्यांच्या अधिवासात सोडल्यास पर्यावरणाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल. सोबतच सर्पदंश झाल्यावर व्यक्तीचे प्राणही वाचविता येतील.

विषारी साप चावल्याची शारीरिक लक्षणे

विषारी सापांचे विष फिकट पिवळसर, अर्ध पारदर्शक व काही प्रमाणात चिकट असते. विषारी सर्पांची त्यांच्या विषाच्या परिणामानुसार दोन प्रकारात वर्गवारी करण्यात आली आहे.

१) न्यूरोटॉक्सिक (मज्जासंस्थेवर परिणाम करणारे)

२) हिमोलॅटिक (रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे)

 न्यूरोटॉक्सिक (मज्जासंस्थेवर परिणाम करणारे)

१) नाग : दंशाच्या जागी सूज येऊ लागते. शरीर जड होऊन ग्लानी येते. हातपाय गळाल्यासारखे वाटतात. तोंडातून लाळ गळू लागते. वास घेण्यास त्रास होतो. तोंडातून फेस येतो, नाडी मंद होऊन हृदयाचे ठोके वाढतात. डोळ्यांच्या पापण्यांवर नियंत्रण न राहिल्यामुळे त्या मिटतात. मळमळ, उलट्या होतात आणि घाम फुटतो. जीभ जड झाल्यामुळे बोलता येत नाही व गिळण्यासही त्रास होतो. बऱ्याचवेळा दातखिळी बसते.

२) मण्यार : हा नागापेक्षा जहाल विषारी असून पोटात किंवा सांध्यात वेदना होऊ लागतात. या सापांचे विषदंत लांबीला कमी असतात. यांचे विष नागाच्या विषापेक्षा खूप तीव्र किंवा जहाल असते. बरीचशी लक्षणे नागाच्या दंशाप्रमाणे असतात. फक्त दंश झालेल्या जागेवर जळजळ होत नाही किंवा सूज येत नाही. दंशानंतर काही वेळाने पोटात आणि सांध्यात अतिशय वेदना होऊ लागतात.

हिमोलॅटिक (रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे)

१) फुरसे : फुरश्याच्या आकाराच्या मानाने त्याचे विषदंत लांब असतात. विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. दंशाच्या जागी जळजळ होऊन ती पसरत जाते. दंश झालेल्या भागातून, लघवीतून व हिरड्यांतून रक्त बाहेर पडते, त्यामुळे अशक्तपणा येतो.

२) घोणस : काही मिनिटातच दंशाच्या जागी जळजळ होऊन दुखू लागते. जखमेवर सूज येते. अवयव लाल होतो, रक्त पातळ होऊन उशिरा गोठते. जळजळ अवयवाच्या उगमापर्यंत पसरते.

सर्पदंश झाल्यावर दिसणारी लक्षणे :

शारीरिक इंद्रियांमधून (नाक, तोंड, कान, डोळे, गुदद्दार, शिश्न) रक्तस्त्राव होतो. तसेच किडणीचे कार्य बंद होणे, डोळ्यांना सूज येणे व पापण्या जड पडणे, डोळे फिरवणे, मूत्राचा रंग लाल किंवा गडद तपकिरी होणे, अस्वस्थ वाटणे, हातपाय जड पडणे, सांधे दुखणे, गिळण्यास त्रास होणे, पोटात दुखणे, भान नसणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडावाटे फेस येणे, भान नसणे ही सर्व लक्षणे दंशाच्यानंतर १० मिनिटे व ५ तासामध्ये निर्माण होतात. योग्य उपचार व वैद्यकीय सल्ल्याने ही सर्व लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरा होतो. मात्र ताबडतोब योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

सर्पदंश उपचारपद्धती

– रूग्णास झोपू देऊ नये.

– इतर तातडीची चिकित्सा करावी.

– रुग्णाला २४ ते ४८ तास निरीक्षणाखाली ठेवावे.

– योग्य सुविधा उपलब्ध नसतील तर रुग्णास प्रथमोपचार करून ताबडतोब मोठ्या रुग्णालयात न्यावे.

– रुग्णाला हालचाल करू न देणे व त्याला धीर देऊन मनातील भीती घालविणे.

– सर्पदंशाची जागा ही हृदयाच्या उंचीहून खाली ठेवणे तसेच दंशामुळे निर्माण झालेल्या जखमेची योग्य चिकित्सा करणे.

प्रथमोपचार महत्त्वाचे

१) सर्पदंशानंतर रुग्णाला घाबरवण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करावा, कारण घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष संपूर्ण शरीरात पसरते.

२) चाव्याच्या (दंश झालेली) जागा कोरड्या, सेल पट्टी किंवा कपड्याने झाका. ज्या केंद्रात विष प्रतिरोधक त्वरित मिळू शकेल अशा ठिकाणी त्या व्यक्तीला लगेच हलवा.

३) चाव्याजवळ कापड किंवा टूर्निर्नकट बांधू नका, यामुळे परिसंचरण बंद होईल.

४) घाव धुवू नका. घावावर बर्फ लावू नका.

५) जखमेतून विष शोषून घेण्याचा प्रयत्न करू नका.

सर्पदंशापासून बचाव करण्यासाठी

दाट गवतांतून फिरण्यापूर्वी किंवा साहसी उपक्रमांना जाण्यापूर्वी जाड बूट आणि लांब पँट घालावी.  रात्री मशाल, टॉर्च किंवा दिवा घेऊन बाहेर पडावे. कोणताही खडक किंवा दगड हलवतांना, स्वयंपाक करण्यासाठी लाकूड गोळा करताना, डोंगराळ भागात फिरतांना किंवा लहान तलावात आणि नद्यात पोहतांना सावध राहावे.

स्टोअर किंवा बेसमेंटमध्ये साप किंवा उंदरांसाठी योग्य रीपेलेंट वापरावे. हालचाल न करणारा किंवा अर्धमेला वाटणारा साप पकडण्याचा प्रयत्न करू नये.  साप पाळणे तसेच जमिनीवर झोपणे टाळावे. परिसरात दाट झाडी, दलदल किंवा गवत असल्यास झोपेच्या आधी अंथरूण तपासावे. योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यू वा विकृती रोखता येऊ शकते.

अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास बॅटरी घेऊन फिरावे.  पाय किंवा काठी आपटत चालावेत्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल.  जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व मजबूत उंच बूट किंवा रबरचे बूट अपघाती चाव्यापासून सहजपणे संरक्षण करतात.  जंगलामध्ये साप दिसताक्षणी जवळ जान फोटो काढण्याचा अट्टाहास करू नये.

 राहुल पाटील,उपवनसंरक्षक

व्यक्तीला साप चावला त्यावेळी घाबरून न जाता त्या व्यक्तीला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेन जावे. स्थानिक वैद्य किंवा मांत्रिक यांच्याकडे जान वेळ न घालविल्यास तातडीचे उपचार सुलभ होतील. पुणे जिल्ह्यात सर्वच आरोग्य केंद्रात सर्पदंशाचे उपचार उपलब्ध आहेत. औषधोपचाराचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. सर्वच साप विषार नसतातमात्र रुग्णाला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे योग्य ठरते.

डॉ.अशोक नांदापूरकरजिल्हा शल्यचिकित्सक

.

.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

.

.

.

संकलन – जिमाका पुणे

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\