गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
अलिबाग,दि.26 :- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर रस्त्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रुपाली पाटील, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधमकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पनवेल येथून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. रायगड जिल्हयातील या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांनी कासू, नागोठणे, वाकण फाटा, खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदी ठिकाणी जावून रस्त्याच्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागातील अनेक परिसरांमध्ये पावसामुळे पडलेल्या खड्डयांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी खड्डे युध्द पातळीवर बुजविण्याच्या दृष्टीने “रेडीमिक्स” या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान कशा पध्दतीने रस्त्यांमधील खड्डे बुजवतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.
कोणत्याही परिस्थितीत युद्ध पातळीवर प्रयत्न करून गणेश उत्सवापूर्वी रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याचे सक्त आदेश मंत्री महोदयांनी संबंधित विभाग व कंत्राटदारास दिले.
तसेच गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यास रस्त्यावरून प्रवास करताना त्रास होणार नाही,याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी आणि रस्ता दुरुस्ती, रस्ता जोडणे, पेव्हर ब्लॉक टाकणे आदि संबंधित कामे तातडीने संपवावीत, असेही सांगितले.
रस्ता दुरुस्ती संदर्भात कोणतेही कारण न सांगता रस्ता दुरुस्ती तातडीने आणि प्राधान्याने व्हायलाच हवी. जेणेकरून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होणार नाही यासाठी कामास गती द्यावी. वेगवेगळे कंत्राटदार नेमून त्यांच्यामार्फत ही दुरुस्ती सुरु आहे. केवळ गणेशोत्सव नव्हे तर त्यापुढेही काही काळ रस्ते चांगले राहतील, अशी दुरुस्ती करण्याचे त्यांनी संबंधितास सांगितले. याशिवाय महामार्गाचे राहिलेले काम पावसाळा संपताच तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे, असेही निर्देश संबंधित विभागाला सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांनी दिले.
त्याचप्रमाणे रस्त्यावर अडथळा होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी जिल्हा पोलीस विभागाला केली.
मुंबई गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. परंतु या संदर्भात काही प्रकरणे कोर्टात असल्यामुळे कामाच्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण होत आहे. तरीही येत्या डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गातील सर्व अडचणी दूर करुन संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग काँक्रिटीकरण पूर्ण होईल,असा विश्वास श्री.चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377