
– पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराची चौकशी होण्यासाठी सुरू होते अॅड. अभय पाटील यांचे उपोषण
-चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी करणार पुढील चौकशी.
पाचोरा, दि.२०-पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचा मनमानी कारभार व तालुक्यातील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारा विरोधात अनेक वेळा तक्रारी अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील हे दि. १७ रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी पंचायत समिती गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती सदस्य यांनी आपण दिलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करु असे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र अभय पाटील यांनी त्यांचे तोंडी आश्वासन न मानता उपोषण सुरूच ठेवले होते. अखेर आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी बोलुन याबाबत योग्य मार्ग काढावा असे सांगितल्यानंतर आज दि. २० रोजी उपोषण कर्त्यांच्या सर्व तक्रारींच्या चौकशी करिता एक समिती गठीत करण्यात आली असून या सर्व प्रकरणांची चौकशी ही पंचायत समिती (चाळीसगाव) चे गट विकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश आल्यानंतर अॅड. अभय पाटील यांनी ते मान्य करत उपोषणाची सांगता केली. त्यांना आमदार किशोर पाटील यांनी नारळ पाणी देवुन उपोषण सुटले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, पंचायत समिती सभापती वसंतराव गायकवाड, माजी सभापती सुभाष पाटील, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, तालुका अध्यक्ष शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, प्रविण ब्राम्हणे उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामांमध्ये झालेला गैर व्यवहार तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या दप्तरात अनियमितता व अफरा तफर असे प्रकार आढळुन आलेले असतांना त्याबाबत अनेक गावांच्या ग्रामपंचायती विरुद्धचे पुराव्यासह तक्रार अर्ज प्रलंबित आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये दारिद्रय रेषेखालील यादीत झालेला घोळ, स्वच्छ भारत मिशन व वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थींच्या योजनेत गैरव्यवहार पुराव्यानिशी दिसुन आला असतांना देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कुठल्याही प्रकरणांची चौकशी न करता सदर झालेल्या गैरव्यवहारातील संबंधितांना ते पाठिशी घालत असल्याचे यावरून दिसुन येत आहे. गट विकास अधिकारी हे जबाबदार अधिकारी असतांना देखील त्यांनी कुठलीच कारवाई न करता या सर्व प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळेच व अनेकदा त्यांना याबाबत पुराव्यानिशी तक्रारी देऊनही त्याचा काही एक उपयोग झालेला नसल्याने न्याय मिळण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय शरद पाटील हे तहसिल कार्यालयासमोर दि. १७ आॅगस्ट पासुन बेमुदत उपोषणाला बसले होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार यासर्व प्रकरणांची १५ दिवसांत चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने सदर चे उपोषण सोडण्यात आले आहे.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



