उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण; विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचे जतन करावे : डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
नाशिक,दि.12-सर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचेही जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी डॉ. गावित बोलत होते. या कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक जात पडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील, उपायुक्त अविनाश चव्हाण, सुदर्शन नगरे, हितेश विसपुते, सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व राज्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले की, जीवनात चांगला खेळाडू होण्यासाठी शिस्त, कौशल्य, चांगल्या सवयी, शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे. आश्रम शाळेच्या आवारात क्रीडांगण तयार करावेत. तसेच संस्कृतीचे महत्व सांगतांना त्यात पारंपरिक वाद्य, नृत्य, भाषा यांचे शिक्षण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात यावे, जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक होण्यास मदत होईल.
केंद्र व राज्य शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी संधी प्राप्त होत असते, या संधीचे रूपांतर स्वतःच्या प्रगतीसाठी करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांनी स्वत:सोबतच गावातील इतर विद्यार्थ्यांनाही या विविध योजनांची माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळून ते देखील आयुष्यात प्रगती करतील. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत आवश्यकती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मंत्री डॉ. गावित यांनी दिली.
मंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले, विविध स्तरावर स्पर्धा घेतांना त्यात शिस्तीचे पालन होणे आवश्यक आहे. त्यासोबतच आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा व्यवस्थित पार पडतील त्यासाठी नियोजन करणे गरजेचे असल्याचेही मंत्री त्यांनी सांगितले.
आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे म्हणाले, आदिवासी विद्यार्थी हे जिद्दी, साहसी व चिकाटीचे असतात. या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता आदिवासी विकास विभाग सातत्याने कार्यरत आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आदिवासी विभाग प्रयत्न करत आहे. आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्य व कलागुणांना उभारी देण्याचे काम आदिवासी विभाग करत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील एक हजार 746 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. यासर्व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेसाठी शपथ देण्यात आली. त्यानंतर बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे डॉ. गावित यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



