मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नावीण्यपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – मानव विकास आयुक्त एन. के.पाटील
जळगावला आढावा बैठक
जळगाव, दि.8: जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीतून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नावीण्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मानव विकास आयुक्त एन. के. पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकजकुमार आशिया, मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त श्री. पाटील यांनी सांगितले, मानव विकास ही संकल्पना जिल्ह्याऐवजी तालुकास्तरावर राबवीत या कार्यक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या तालुक्यात मानव विकास निर्देशांक कमी आहे त्या तालुक्यात निर्देशांक उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य व उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर व एरंडोल या सात तालुक्यांचा यात समावेश आहे.
या सातही तालुक्यांमध्ये शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी मानव विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आता या सात तालुक्यांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले, या सात तालुक्यात सायंकाळी सात ते रात्री दहा यावेळेत 157 अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. तेथे क्रमिक पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. या तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी गाव ते शाळादरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तालुकास्तरावर बालभवन केंद्र स्थापन करण्यात आले असून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. चौधरी यांनी मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377