आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ

पुणे दि. 25 : शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे,  खासदार गिरीश बापट, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल.

गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा महाराष्ट्राने समृद्ध केला

देशाला गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरुजनांनी शिक्षणांची गंगा शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ध्येयनिष्ठ शिक्षणसेवेची परंपरा आजचे शिक्षकही पुढे नेत आहेत.

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना नवा वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे कार्य केले. जयंत नारळीकर, जि.प. शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता अध्यापकांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी एका विषयापुरते मर्यादित न राहता ज्ञानकक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानासोबत नव्या संकल्पना मांडण्यासाठी आणि जगातील इतर भाषा, संस्कृती शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. 

बुद्धिवंतांना अधिक ज्ञानवान करणारी संस्था

अध्यापक विकास  संस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल, शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा घडून येतील. जगातील नव्या ज्ञानाचा उपयोग प्राध्यापकांना झाल्यास त्याचा फायदा नव्या पिढीला होईल. संस्थेची इमारत प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढविणारी आहे. संस्थेत गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देताना त्यात सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. संस्थेत असलेल्या सुविधा आणि दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे ही संस्था अध्यापकांना अधिक ज्ञानवान करणारी ठरेल, असेही श्री. पवार म्हणाले.

पुणे येथे सारथी संस्था, सहकार भवन, कृषी भवन, कामगार भवन, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय आदी संस्था पुढील 50 वर्षांचा विचार करून उभारण्यात येत आहे. अध्यापक विकास संस्थेतही भविष्याचा विचार करून अधिक उन्नत सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र सुदृढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल – मंत्री उदय सामंत

श्री. सामंत म्हणाले, प्राध्यापकांना प्रशिक्षण देणारी देशातील ही पहिली संस्था आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने अध्यापक विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. अनेक नामवंत संस्था या संस्थेसोबत काम करीत आहेत.  इन्फोसिसने  सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामंजस्य करार आहे. प्राध्याकांसमवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आधुनिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा 60 कोटींचा प्रकल्प असून त्याचा हा पहिला टप्पा आहे. हा प्रकल्प देशपातळीवर आदर्शवत ठरेल असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.

उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व कार्यालये संस्थेच्या इमारतीत एकाच ठिकाणी असतील. संस्थेतील अद्ययावत स्टुडिओमधून राज्य व संघ लोकसेवा आयोग परीक्षेविविषयी विद्यार्थ्यांना आणि खाजगी संस्थेतील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येईल. आधुनिकरित्या प्रशिक्षित प्राध्यापक चांगले ज्ञानदान करतील आणि राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला त्यामुळे अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल – मंत्री आदित्य ठाकरे

श्री. ठाकरे म्हणाले, शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांनाही अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल आणि त्यातून देशाला नवी दिशा दिली जाईल. देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार बापट यांनी संस्थेच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संस्थेचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्त्वाचे अंग आहे. राज्यातील 4 हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे 1 लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ संस्थेचे उपकेंद्र राहतील आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मान्यवरांच्या हस्ते जे.जे. महाविद्यालयाने तयार केलेल्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गडचिरोली येथील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या नागपूर येथील ज्ञान फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अजिंक्य कोटावार यांना पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ‘यंग सोशल इनोव्हेटर’  म्हणून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनोद मोहितकर, विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी संस्थेतील नेतृत्व गुण विकसन केंद्र, नाविन्यता आणि आधुनिक तंत्रज्ञान केंद्र,समानता आणि सर्वसमावेशकता केंद्र, बहुशाखीय अभ्यासक्रम अध्यापन केंद्र, ध्वनिमुद्रण कक्ष आदी विविध कक्षांना भेट देऊन कार्यप्रणालीची माहिती घेतली

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\