कष्ट करण्याची क्षमता म्हणजेच चांगला रोजगार होय :- प्रा गोपाल दर्जी
पाचोरा- ” जीवनात नेहमी नकारात्मक विचारांपासून लांब राहिले पाहिजे. युवकांनी मोठी स्वप्न बघायला शिकणे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ध्येयाचा व्यासंग बाळगणे महत्त्वाचे आहे. अभ्यासात गोडी निर्माण करण्याबरोबरच कष्ट करण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे चांगला रोजगार निर्माण करणे होय” असे प्रतिपादन प्रा. गोपाल दर्जी यांनी केले.
येथील अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा पाचोरा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला 2022’ चे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना जळगाव येथील दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गोपाल दर्जी यांनी श्रोत्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.
पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे तर्फे ही शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शाहू महाराज समाज विकास मंडळ व राजे संभाजी युवा फाउंडेशन पाचोरा यांच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोप सत्र प्रसंगी प्रा गोपाल दर्जी यांनी “युवक व रोजगाराच्या संधी” या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
शिक्षण ही उद्धाराची जननी आहे देशाचा जीडीपी म्हणजे दरडोई उत्पन्नाचा स्तर उंचावण्याची कुवत फक्त युवकांच्या हातात आहे
उद्योग व्यवसाय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आमच्या युवकांकडे नियोजन असलं पाहिजे, दूरदृष्टी, संयम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्पर्श करेल त्या गोष्टीचं सोनं करून दाखविन असा अगम्य आत्मविश्वास त्यांच्यात असला पाहिजे.
प्रामाणिकपणा व कामाचा उत्तम दर्जा सांभाळला गेला पाहिजे. अपयश पचविण्याची क्षमता आमच्या युवकांमध्ये निर्माण व्हायला हवी.
स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी कामाला लागा, समस्या प्रत्येक क्षेत्रात आहेत , समस्यांना आणि संघर्षाला घाबरू नका, संघर्षातच जीवन जगण्याची खरी गंमत आहे – असा मोलाचा सल्लाही सरांनी सरतेशेवटी दिला
आपल्या एक तासाच्या प्रेरणादायी व्याख्यानात बोलताना प्रा. गोपाल दर्जी यांनी सांगितले की, भारत हे युवकांचे राष्ट्र असून या देशात अकुशल कामगारांची संख्या खूप मोठी आहे. भारतातील सर्व अकुशल युवकांना कुशल करण्याची नितांत गरज आहे. म्हणून तरुणांनी आपापल्या आवडीच्या विविध क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. गरीबी ही प्रगतीचा अडसर नसून पोटातील भूक जगण्यासाठी संघर्ष निर्माण करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून जीवनात कायम विजय प्राप्त केला. अशाच पद्धतीने शिवरायांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन युवकांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असे सांगितले.
शितल अकॅडमीचे संचालक प्रा रोहन पाटील यांनी व्याख्यानमालेला तांत्रिक सहाय्य केले. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. चिटणीस सी. बी.पाटील सर यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन केले. शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीने ही ऑनलाईन व्याख्यानमाला यशस्वी झाली.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष प्रा. साहेबराव थोरात, सुनील पाटील, सरचिटणीस राहुल आप्पा बोरसे, चिटणीस चंद्रकांत पाटील सर, व श्री प्रदीप सोमवंशी, संघटक श्री कैलास पाटील, कायदेशीर सल्लागार ऍड सुनील पाटील, पत्रकार नागराज पाटील, गणेश शिंदे, यांचे सहकार्य लाभले.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377