
धुळे:- जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सातपुडापर्वताचा भाग आणि साक्री तालुक्यातील काही भागात अनुसूचित जमातीची लोक वस्तीमोठी आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाचा आदिवासी विकास प्रकल्प विभाग धुळे प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. अनुसूचित जमातीतील मुला- मुलींना उच्च शिक्षण मिळावे म्हणून प्रकल्प कार्यालयांतर्गत आश्रमशाळा कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची नेहमीच आवश्यकता असते. त्यात जात आणि अधिवास या दाखल्यांचाही समावेश आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जात आणि अधिवासाचे दाखले मिळावेत म्हणून धुळे प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेयांनी घेतलेल्या पुढाकारामुळे दाखले विनासायास उपलब्ध झाले आहेत. त्यात आठवीपासून ते बारावी पर्यंतच्या 4 हजार 474 विद्यार्थ्यांना जातीचा, तर 4 हजार 633 विद्यार्थ्यांना अधिवासाचे दाखले महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून एकाच दिवशी देण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व दाखले आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले.
श्रीमती धोडमिसे यांची भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून धुळे येथे उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे येथे सन 2021 मध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाल्या. प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी आश्रम शाळांची पाहणी केली.त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवादसाधत त्यांच्या अडी- अडचणी, समस्या जाणून घेतल्या. या समस्या जाणून घेतल्यानंतर प्रकल्प अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. पहिला टप्पा म्हणून त्यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना जात आणि अधिवासाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राज्यशासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप करण्यात येते. त्यातच त्यांच्याकडे धुळे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पद, अशा दुहेरी संयोगातून आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना जात व अधिवासाचे दाखले मिळणे सुलभ झाले.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे सादर करावे लागतात. काही वेळेस पुराव्या अभावी दाखले मिळविताना त्रास होतो. त्यासाठी दुर्गम भागातील रहिवाश्यांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. त्यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो.या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी न्यूक्लिअस बजेटअंतर्गत धुळे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्वशासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे जातीचे व अधिवास प्रमाणपत्र मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेतला होता.
धुळे प्रकल्पाच्या अधिनस्थ 23 शासकीय व 34 अनुदानित आश्रमशाळेतील आठवी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत दाखले मिळाले.त्यासाठी प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विभाग, मुख्याध्यापकांसह ई- सेवाकेंद्राचे चालक, सेतू तालुका समन्वयकांच्या माध्यमातून दाखले देण्यात आले.आश्रमशाळेतील आठवी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दाखले मिळावेत म्हणून आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेतले. हे दाखले तयार करण्यासाठी त्यांनी शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले. विशेष म्हणजे त्या स्वत: कार्यालयात उपस्थित राहत होत्या. याशिवाय सन 2021 मध्ये सुशासन सप्ताहांतर्गत एकाच दिवशी अनुसूचित जमातीच्या एक हजार विद्यार्थ्यांनाजातीचे दाखले देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त नाशिक श्री.राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेमधून प्रशासनातील पथदर्शी कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक दस्तऐवजांच्या अभावी विविध दाखले मिळण्यास अडचणी येतात. हे विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर लक्षात आले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, महाराजस्व अभियान आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात व अधिवासाचे दाखले वितरणाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.
- तृप्ती धोडमिसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



