आंबेडकर चळवळीतील झुंजार योद्धा विशाल बागुल यांची रिपब्लिकन सेनेच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

पाचोरा : सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, आंबेडकर चळवळीतील झुंजार योद्धा म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते विशाल तात्या बागुल यांची रिपब्लिकन सेना पाचोरा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, त्यामुळे पाचोरा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. विशाल बागुल हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी आपली ओळख ही केवळ पदांमुळे नव्हे तर तळागाळातील लोकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे निर्माण केली आहे. त्यांनी यापूर्वी वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका अध्यक्ष या पदावर काम करताना संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला होता. त्यांच्या कार्यकाळात पाचोरा तालुक्यातील सुमारे ३५ गावांमध्ये शाखा उभारणी करून कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यात आले होते. गावागावात बैठका, संविधान जागृती उपक्रम, सामाजिक प्रश्नांवरील आंदोलन आणि संघटन विस्ताराच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. दरम्यान, पक्षाच्या ध्येय-धोरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे आणि जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, पक्षनिष्ठेचा आणि वैचारिक स्पष्टतेचा आदर्श ठेवत विशाल बागुल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आंबेडकर घराण्याशी असलेली एकनिष्ठ भूमिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर असलेला ठाम विश्वास यामुळे विशाल बागुल यांची निवड रिपब्लिकन सेनेच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी करण्यात आली. निवडीबद्दल बोलताना विशाल बागुल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते पूर्ण ताकदीने काम करतील. “गाव तिथे शाखा” हा मंत्र घेऊन केवळ रिपब्लिकन सेनेच्या शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला जाईल. सामाजिक अन्याय, शोषण आणि वंचितांच्या प्रश्नांवर रिपब्लिकन सेना ठामपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आंबेडकर चळवळीतील योद्धा म्हणून विचारांची मशाल पेटवून ठेवत, युवकांना संघटित करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दि. ३०/१२/२०२५ रोजी मुंबई येथील आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेचा प्रवेश व नियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते विशाल बागुल पाचोरा, दीपक राजपूत सातगाव डोंगरी आणि विलास चव्हाण चाळीसगाव यांनी अधिकृतपणे रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला. याच कार्यक्रमात विशाल बागुल यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी, दीपक राजपूत यांची पाचोरा महासचिवपदी, तर विलास चव्हाण यांची चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव विनोद कांबळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या माध्यमातून संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. विशाल बागुल यांच्या नियुक्तीमुळे पाचोरा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीला नवे नेतृत्व मिळाले असून, सामाजिक लढ्यांना अधिक धार मिळेल, अशी भावना मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि विविध स्तरातून व्यक्त होत आहे. संविधान, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी झुंजारपणे लढणाऱ्या या योद्ध्याकडून रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक वाटचालीला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



