ई पीक पाहणी मोबाईल ॲप सुरु
जळगाव:- महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी हा महत्वकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. गत वर्षी पासून ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपद्वारे आतापर्यंत सुमारे 4,82,816 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपमध्ये नोंदणी केली आहे. मागील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करुन या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामाध्ये 4,57,857 हेक्टर, रब्बी हंगामामध्ये 2,94,208 हेक्टर, शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी ॲपद्वारे 400 च्या वर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.
खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे नोंदविण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. मागील वर्षभराच्या अनुभवावरुन व स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करुन शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाईल ॲप व्हर्जन- 2 विकसित करण्यात आलेले आहे. सदरचे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देत आहे.
ई- पीक पाहणी व्हर्जन -2 ॲप मधील नवीन सुधारणा
सुधारित मोबाईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षास व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधांमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणीत मानण्यात येणार
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार असून अशारीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.
किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत होणार
वरीलप्रमाणे शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी 10% नोंदीची पडताळणी तलाठी यांचेमार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकीचा फोटो असलेल्या नोंदी अंती विहित अंतराच्या बाहेरुन घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे. तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करुन त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होतील.
48 तासात खातेदारास स्वत: पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी अशी पीक पाहणी नोंदविल्यापासून 48 तासामध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा
किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास ई-पीक पाहणी ॲपमध्येच शेतकऱ्याला “आपणास किमान आधारभूत किमान योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय?” असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्याने होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकांसह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा
यापूर्वीच्या मोबाईल ॲपमध्ये मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांचेकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.
ॲपबाबत अभिप्राय व रेटिंग नोंदविण्याची सुविधा
ई-पीक पाहणी व्हर्जन-2 मध्ये वापरकर्त्यांना ॲपबाबत त्यांचे अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलबध करुन देण्यात आलेली आहे.
ई-पीक पाहणी ॲपमध्येच मदत बटन देण्यात आलेले आहे.
वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये मदत हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. तसेच ई-पीक पाहणी ॲपमधील कायम पड क्षेत्र नोंदविणे, बांधावरील झाडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे, गावची पीक पाहणी पाहणे इत्यादी बाबतची माहिती देणाऱ्या दृकश्राव्य क्लीपच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. याचा वापर करुन शेतकरी ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे कारण ई पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.
खरीप हंगाम 2022 चे पीक पाहणीची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. यासाठी नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे सुधारित मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377