जळगाव मध्ये भरला रानभाजी महोत्सव- शेतकरी व कृषि शेतकरी गटांच्या 70 स्टॉलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रानभाज्या,रानमेवा,रान फळे यांची केली विक्री
जळगाव दि. 9 – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी कृषि विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचा आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील ७० शेतकरी व कृषि शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, रानमेवा, रानफळे व रानभाज्यांची पाककला कृति व त्यांची विक्री करिता शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा तसेच पारंपारिक रानभाज्यांचे जतन होण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित केल्यास शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळेल व नागरिकांना त्याचे महत्व कळेल अशी अपेक्षा आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.
नैसर्गिक रित्या बांधावर आढळणा-या विविध रानभाज्या व त्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्याने विविध प्रकारचे अन्न घटक, जीवनसत्त्वे, खनिजे मानवी शरिररास कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात याबाबत चर्चा केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांकरीता दरवर्षी या पद्धतीने महोत्सव भरवण्याचा आम्ही मागील ४ वर्षापासून प्रयत्न करीत असून यापुढे देखील शेतकऱ्यांकरीता आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी जिल्हा प्रशासन नेहमी सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
या कार्यक्रमात एम जे कॉलेज प्रा. चोपडा सर यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विभागीय कृषि सह संचालक रविशंकर चलवदे यांनी रानभाज्यांचे मानवी आहारातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना व पाककला कृति सादर केलेल्या शेतकरी व शेतकरी गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात करटुले, अंबाडी, शेवगा, हादगा, फांग, केळफुल, रानमेथी, अळू, तांदूळजा, आघाडा, पाथरी, घोळ, कुरडू, गुळवेल इ. रानभाज्या विक्री करता ठेवण्यात आल्या होत्या.या महोत्सवास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) दादाराव जाधवर कृषी विकास अधिकारी (जि. प.) सुरज जगताप, तालुका कृषी अधिकारी जळगाव श्रीकांत झांबरे, रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, मानद सचिव तुषार तोतला, भद्रेश शहा व पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवाला जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित राहून त्यांनी आपल्या रानभाज्याची विक्री केली. नागरिकांनी रानभाज्या पासून महिला गटांनी बनविलेल्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेतल्याची माहिती विभागीय कृषि सह संचालक रविशंकर चलवदे यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी तर आभार प्रकल्प उपसंचालक (आत्मा) दादाराव जाधवर यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377