गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोलापूर येथील गुरव समाज महाअधिवेशनास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती
गुरव समाजाकडून ईश्वर सेवा व लोकप्रबोधनाचे कार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर, दि. 11, (जि. मा. का.) : गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाजाच्या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे उद्घाटन झाले.
डी. ए. कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या महाअधिवेशनास महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, ज्ञानराज चौगुले, शहाजीबापू पाटील, राणा जगजीत सिंह, यशवंत माने आणि राजेंद्र राऊत, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे, डॉ. नितीन ढेपे, डॉ. मल्लिकार्जुन गुरव आदि उपस्थित होते.
गुरव समाजाच्या महाअधिवेशनास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कार्यक्रमास समाजबांधवांच्या उपस्थितीवरून या समाजाची एकजूट दिसून येत आहे. गुरव समाज मंदिरात स्वच्छता, पावित्र्य, मांगल्य ठेवतो. हे शासन शेतकरी, कष्टकरी, कामगार, दीनदुबळे, वंचितांना न्याय देणारे असून, गत पाच ते सहा महिन्यात घेतला गेलेला प्रत्येक निर्णय या सर्वांचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतला गेला असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गुरव समाज अल्पसंख्य असला तरी दुधातील साखरेसारखे काम करतो, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंदिरे, पूजास्थळे समाज परिवर्तन करण्याचे साधन असून, संस्कार रूजविण्याचे काम या ठिकाणी होत असते. वारकरी समाजाची मोठी परंपरा सांगणारा व हिंदू समाजाला जीवित ठेवण्याचे काम गुरव समाज करतो. ईश्वर सेवा व लोकप्रबोधनाचे कार्य हा समाज शतकानुशतके करत आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून हा समाज संघटित झाला असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशनाचे आयोजक विजयराज शिंदे यांनी गुरव समाजाला एकत्र करण्यासाठी अधिवेशन आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरव समाज भक्त आणि देव यांच्यातील दुवा असून, त्यांच्या मागण्यांवर शासनाने मार्ग काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी गुरव समाजाचे नीळकंठ गुरूजी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, मान्यवरांच्या हस्ते शिवबिल्वपत्र स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
स्वागत, प्रास्ताविक माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केले. आभार डॉ. नितीन ढेपे यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी, तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गुरव समाजबांधव उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377