आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेने राज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे- राज्यपाल

मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु उद्योग जगत व कॉर्पोरेट्सच्या सहकार्याशिवाय अर्थपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देता येणार  नाही. या दृष्टीने लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करावे असे आवाहन करताना औद्योगिक क्षेत्रातील या समूहाचा प्रत्यक्ष अनुभव युवकांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने आयटीआय प्रशिक्षकांसाठी आयोजित कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप संस्थेच्या मढ आयलंड, मुंबई येथील अकादमीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लार्सन अँड टुब्रोचे समूहाचे अध्यक्ष ए.एम.नायक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. रामकृष्णन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शहाणे, प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख बी.ए.दमाहे, मास्टर ट्रेनर लार्सन अँड टुब्रो प्रिया सावंत, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी तसेच संस्थेत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करीत असलेले राज्यातील आयटीआय प्रशिक्षक उपस्थित होते.

            लार्सन अँड टुब्रो हे देशाच्या उद्योग जगतातील एक प्रेरणादायी नाव आहे. समूहातर्फे केलेल्या प्रत्येक कार्यात गुणवत्ता असते असे सांगून एल अँड टी समूहाने देशातील अनेक राज्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण संस्था उभाराव्या व इतर उद्योग समूहांनी देखील युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे : ए एम नायक

            समाजात पांढरपेशा नोकऱ्यांना मान आहे परंतु श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानले जाते ही मानसिकता बदलली पाहिजे, असे प्रतिपादन एल अँड टी चे समूह अध्यक्ष ए.एम.नायक यांनी यावेळी केले.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे व कौशल्याच्या माध्यमातूनच देशाला आत्मनिर्भर बनविता येऊ शकते. देशाला कौशल्य राजधानी बनविण्याच्या दृष्टीने मात्र अजूनही फार मोठे कार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

            एल अँड टी समूहाने मुंबई येथे सन २०२१ साली अत्याधुनिक सुविधा असलेली कौशल्य प्रशिक्षक अकादमी सुरु केली असून त्याठिकाणी एल अँड टी मधील अनुभवी लोकांना अध्यापक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे असे त्यांनी नमूद केले.

            आतापर्यंत अकादमीने महाराष्ट्र शासनाच्या १ हजार ७ आयटीआय प्रशिक्षकांना या संस्थेत प्रशिक्षण दिले असून या कौशल्याचा समाजात सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.

            लार्सन अँड टुब्रोने आपल्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत स्थापन केलेल्या लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक अकादमी अंतर्गत १ हजार आयटीआय प्रशिक्षकांचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!