एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य

भारतात येत्या सप्टेंबर महिन्यात ‘जी-20’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध 200 बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी चार बैठका पुण्यात होणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताकडे जी-20 चे अध्यक्षपद येणे विशेष गौरवाची बाब आहे. विकासाच्या विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविण्याच्यादृष्टीनेदेखील परिषदेला महत्त्व आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विकासाच्यादृष्टीने जे करार होतात त्यासाठी पोषक वातावरण अशा बैठकांमधून तयार होत असते. त्यादृष्टीने पुण्यात होणाऱ्या बैठकांकडे पहायला हवे. पुणे शहर आणि जिल्हा अनेक क्षेत्रांमध्ये टेकऑफ घ्यायच्या तयारीत असताना, असे आयोजन आणखी महत्त्वाचे ठरते. इथली संस्कृती, विकासाला पूरक वातावरण, शैक्षणिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास लक्षात घेता आपल्या प्रगतीला आणखी गती देण्याचे कार्य या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.

अत्याधुनिक उच्च शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने पुण्यातील औद्योगिक विकासही वेगाने होत आहे. जिल्ह्यात अनेक नामांकित उद्योग आहेत. इथले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रही वेगाने प्रगती करते आहे. रेल्वे, महामार्ग, हवाई वाहतूक आणि जवळच असलेले मुंबई बंदर ही पुण्याची जमेची बाजू आहे. इथला इतिहास, संस्कृतीदेखील परदेशातील प्रतिनिधींना आकर्षित करते. एका बाजूला उद्योग-व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि अनुकूल वातावरण पुण्यात असल्याने अनेक देशांचे लक्ष पुण्याकडे आहे. त्यामुळे पुण्यामध्ये ही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद होणे ही आपल्यासाठी मोठी संधी आहे.
भारताच्या जी-20 अध्यक्षकाळाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. ही संकल्पना जीवसृष्टीतील परस्पर संबंध आणि त्यांच्याशी संबंधीत पर्यावरणदृष्ट्या शाश्वत विकासावर भर देणारी आहे. पुणे ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांनी ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ म्हणत विश्वकल्याणाचा संदेश दिला, संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ म्हणताना पर्यावरणाचे महत्त्व मांडले आहे. संतांचा हा वैश्विक विचार जी-20 बैठकांमध्ये चर्चिला जाणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
पुण्यातील पहिली बैठक ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्कींग ग्रुप’ची असणार आहे. या बैठकांच्या ठिकाणी विविध दालनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन, इथल्या पायाभूत सुविधा, वेगाने होणारा शहराचा आणि शहरातील सुविधांचा विस्तार, औद्योगिक विकास, पर्यटन, आदिवासी संशोधन व विकास संस्था, सामाजिक वनीकरण आदींची दालने ठेवण्यात येणार आहेत. त्याविषयीची माहिती आलेल्या प्रतिनिधींना देण्यात येईल. उदाहरणार्थ एखादा बचत गट जर उत्तम उत्पादन करत असेल किंवा स्टार्टअपचा नाविन्यपूर्ण प्रकल्प असेल तर तेदेखील प्रदर्शित केले जाईल.
एकदा शहरात आपल्यासाठी काय उपयुक्त आहे हे प्रतिनिधींच्या लक्षात आले की पुढील चर्चेचा मार्ग त्यातून निघत असतो. विकासाची प्रक्रिया यातून गती घेते. त्यामुळे या दोन दिवसांचा पुरेपूर उपयोग करीत आपल्या चांगल्या बाबी जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. पुणे शहर एक एज्युकेशन हब, कल्चरल सिटी, स्टार्टअपचे केंद्र, औद्योगिक नगरी, आयटी सेंटर अशी बहुआयामी ओळख प्रस्थापित व्हावी यादृष्टीने आवश्यक बाबींवर लक्ष देण्यात येत आहे. त्यासोबत जी-20 परिषदेविषयी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
जी-20 अध्यक्षपदाच्या कालावधीत प्रथमच स्टार्टअप जी-20 गटाची स्थापना करण्यात आली आहे. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी या गटाची चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. पुणे हे स्टार्टअप्सचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे भारतात होणारी ही परिषद पुण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच महत्त्वाची ठरेल यात शंका नाही. पृथ्वीच्या उज्ज्वल भविष्याच्यादृष्टीने एक सकारात्मक संदेश पुण्यातून जावा आणि यानिमित्ताने आपल्या क्षमता जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर प्रदर्शित व्हाव्यात, यापेक्षा अभिमानास्पद आणि समाधानाची बाब ती कोणती?

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



