
पाचोरा-सांस्कृतिक उत्सव हे आपणांस वैभवशाली इतिहासाचे स्मरण करुन देतात त्यात यात्रा हे उत्सव महत्वाचे असतात आपण उत्सवात सहभागी होतो तेव्हा कळत नकळत आपल्या परंपेरची जोपासन करीत असतो व या सांस्कृतिक परंपरेचा वारसा एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे जात असतो.
पाचोरा येथील सुमारे १८९ वर्षाची परंपरा असणारा श्री बालाजी महाराजांचा रथयात्रा उत्सव कार्तिक शुध्द चतुदर्शी म्हणजे वैकुंठ चतुदर्शीला असतो या वर्षी सदर रथयात्रा व मिरवणुक उत्सव दिनांक ०७.११.२०२२ रोजी सोमवारी आयोजित केला आहे.
श्री बालाजी महाराज यांची मुर्ती रथात बसवुन ढोल ताशे लेझीम यांचे निनादात मिरवणुक ही रथगल्ली विठठल मंदीर रोड तलाठी कार्यालय जामनेर रोड, महात्मा गांधी रोड व परत रथगल्ली अशी काढली जाते. रथ मिरवणुक दुपारी २.०० वाजता सुरु केली जाते व ती रात्री १०.०० वाजता संपते श्री बालाजी महाराजांचा रथ हा दोर बांधुन लोकसमुहाद्वारे श्री बालाजी महाराज की जय या घोषणेच्या निनादात ओढला जातो. मिरवणुकीत शहरातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात या उत्सवाच्या निमित्ताने गांधीचौक, जामनेर रोड, शिवाजी चौक या भागात मोठी यात्रा भरते.
श्री बालाजी महारांजाना प्रसाद म्हणुन केळी व नारळ चढविण्याची अर्पण करण्याची प्रथा आहे. रथ मार्गात भाविक रथाची पुजा करतात आरत्या ओवाळतात. सुमारे इ.स. १५६० च्या सुमारास तामसवाडी ता पारोळा येथील स्थानिक श्री पिलाजी पाटील हा गावकऱ्यांना त्रासदायक ठरला होता म्हणुन गावकऱ्यांनी कोल्हापुरकर महाराजांकडे संरक्षणाची मागणी केली. सदर विनंती वरुन महाराजांनी सरदार घराण्यातील श्री अर्जुन पाटील यांना तामसवाडी येथे त्यांचे प्रतिनिधी म्हणुन कारभार करण्यास पाठविले असता त्यानी श्री पिलाजी पाटील यांचे नामोहरण करुन गावांत शांतता प्रस्थापित केली तेव्हा त्यांना मुलकी आणि पोलीस पाटीलकी अश्या दोन्ही पदव्या बहाल करण्यात आल्यात. कालातंराने दुष्काळ पडल्याने अर्जुन पाटील यांच्या घराण्याची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने त्यांचे वंशज श्री रामा पाटील व त्यांचे पाच भाऊ पाचोरा येथे स्थायीक झाले थोडयाच दिवसात त्यांनी मेहनतीने व सदगुणांनी शेती संपत्ती व प्रतिष्ठा मिळविली व ते एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणुन ओळखले जाऊ लागले. रामा पाटील यांचे भाऊ शामा पाटील हे दरवर्षी दिंडीसोबत पायी श्री क्षेत्र पंढरपुर येथे वारी करीत असत. एकदा ते पंढरपुर येथे वारीसाठी गेले असता चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या प्रवाहात हात घातला असता त्यांच्या हाताला श्री बालाजी महाराजांची दगडी मुर्ती लागली परमेश्वर प्रसन्न झाला या भावनेने त्यांनी ती मुर्ती दिंडीसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात पाचोरा येथे आणली व घडलेला वृतांत आपल्या भावांना सांगितला. श्री शामा पाटील यांना मुलबाळ नसल्याने त्यांच्या वाटयाला जी संपत्ती आली तिचा विनियोग सर्व भावांनी पाचोरा येथे श्री बालाजी मंदीर व रथ तयार करण्यासाठी केला. काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगांव राजा येथील पंडीत व महंताना बोलावुन सदर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येवून रथाची यात्रा व मिरवणुक उत्सव सुरु करण्यात आला. तेव्हा पासुन ते आजतागायत सदर उत्सव हा उत्साहात व आनंदात सुरु आहे.श्री बालाजी महारांजाचा रथ हा त्यावेळचे पाचोरा, पारोळा व नगरदेवळा येथील कुशल कारागीरांनी सागवानी लाकडापासुन तयार केला असुन रथाची उंची ३० फुट इतकी आहे. रथावर सुदर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे. रथाचे दिवशी रथाचे वर कळस ठेवला जातो तर अग्रभागी लाकडी घोडे व सारथी म्हणुन अर्जुनाची मुर्ती बसविली जाते त्याचे दोनही बाजुस चोपदार यांच्या मुर्त्या उभ्या केल्या जातात तसेच मागील बाजुस राक्षसाच्या मुर्त्या उभ्या केल्या जातात पुढील भागी कळसाचे खाली परी व श्री हनुमानजी यांच्या मुर्त्या बसविल्या जातात. रथ मिरवणुकीचे दिवशी रथाचे चारही बाजुस भगवे निशाण, ध्वज, केळीचे खांब, उस, झेंडुच्या फुलांच्या माळा लाऊन रथ आकर्षक व सुशोभित केला जातो. तसेच विजेची रोषणाई केली जाते वरील प्रमाणे रथ सजविण्याचे अगोदर ३ दिवस त्यास पाण्याने स्वच्छ धुवुन साफ केले जाते व संपूर्ण रथास तेलपाणी लावले जाते त्यामुळे रथ चमकदार दिसतो.
रथयात्रा मिरवणुकीचे आदल्या दिवशी रात्री ८.०० वाजता श्री बालाजी महाराज यांची पालखी गावातुन काढली जाते. गावात घराघरातुन सदर पालखीची पुजा केली जाते व श्री बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले जाते. सदर रथयात्रेचे आयोजन श्री बालाजी मंदीर संस्थान, पाचोरा यांचे मार्फत करण्यात येवुन रथाची संपूर्ण देखभाल व व्यवस्था या सयाजी पाटील परिवारामार्फत केली जाते.सयाजी पाटील परिवार हे मुळचे कोल्हापूरचे परंतु कालांतराने ग्रामीण भाषेत कोल्हापूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन कोल्हे असा झाला व कोल्हयांचा रथ म्हणुन ओळखला जाऊ लागला.
रथ मिरवणुकीपूर्वी रथाची पुजा व धार्मिक विधी केला जातो पुजेचा मान पाटील परिवारातील नवविवाहीत जोडप्यास दिला जातो. यावर्षी श्री अल्पेश पाटील व सौ प्रणाली पाटील यांचे हस्ते रथाची विधीवत पुजा केली जाणार आहे. धार्मिक विधी व दैनंदिन पुजा अर्चा करण्याचा मान हा श्री प्रमोद जोशी यांचे कडेस आहे. पाचोरा येथील के राघो गणपत पाटील यांचे घराण्यास देवाचे चोपदाराचा मान आहे. हल्ली त्यांचे नातु प्रा गिरीष पाटील हे पारंपारीक पोशाखात चोपदाराचे काम पाहतात. रथ थांबविणे, वळविणे यासाठी लाकडी मोगरीचा उपययोग केला जातो. सदरमोगरी लावण्याचे महत्वाचे व जोखमीचे काम हे श्री अशोक वाडेकर व श्री सुभाष सोनवणे व त्यांचा सर्व परिवार आनंदाने सहभागी होऊन पार पाडतात. रथापुढे पारंपारीक पध्दतीने मशाल लावल्या जातात सदरचे काम श्री परशुराम अहिरे व त्याचे सहकारी श्री नितीन शिरसाठ यांना देणेत आले आहे. सयाजी पाटील परिवार पाचोरा, मित्र परीवार तसेच पाचोरा शहरातील सर्व भाविक भक्तगण नागरीक यांचे अथक परिश्रमाने सदर रथ यात्रा मिरवणुक आनंदाने व उत्साहाने पार पाडली जाते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



