जळगाव, दि. 28 – महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (Protection of Child Sexual Offences Act 2012) (POCSO) वर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम हॉल येथे संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संजय सेंगर व सौ. सायली पालखेडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्दिष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या मनोगतात POCSO कायद्यासंदर्भातील सर्व बाबी समजून घ्याव्यात. कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी व समस्या दूर करून घ्याव्यात व प्रभावी कार्यवाही करावी, असे आवाहन प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य व बालकांच्या विषयाबाबत तज्ञ असलेले संजय सेंगर यांनी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे कायद्याच्या सर्व तरतुदी तसेच पोलीस विभाग व इतर यंत्रणा यांची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कार्य करतांना येणाऱ्या अडचणी व सदर कायद्याच्या तांत्रिक बाबी अतिशय सोप्या शब्दात समजून सांगितल्या. प्रशिक्षण सत्राच्या शेवटी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका व समस्यांचे निरसन केले. या कायद्याशी संबंधित असलेले मार्गदर्शनपर पीपीटी व इतर संदर्भ साहित्य सर्वांना उपलब्ध करून दिले.
बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. देवयानी गोविंदवार व सदस्य संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बालकांचे योग्य पुनर्वसन करताना पोलीस यंत्रणा, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील बालगृहातील अधिकारी/कर्मचारी तसेच चाईल्ड लाईन व समतोल संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे सहकार्य व समन्वय मिळत असल्याचे सांगितले. पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अधीक्षिका सौ. जयश्री पाटील, मुलींचे बालगृह व परिविक्षा अधिकारी सौ. सारिका मेतकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांनी मानले.
लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कायद्यातील तांत्रिक बाबी व तरतुदींच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्यास्तरावर कार्यरत बाल कल्याण समिती तसेच बाल न्याय मंडळ यांचे सदस्य, विशेष बाल पोलीस पथक, सर्व बाल कल्याण पोलीस अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा परीविक्षा अधिकारी एस.आर.पाटील, अधीक्षक आर.पी. पाटील, परीविक्षा अधिकारी महेंद्र पाटील व इतर अधिकारी/कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी, बालगृह/निरीक्षणगृहातील सर्व अधीक्षक व कर्मचारी, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, चाईल्ड लाईन व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या एकदिवसीय कार्यशाळेस उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377