अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन
जळगाव:- रविवारी (30 एप्रिल) झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जामनेर शहरासह तालुक्यातील काही भागात शेतपीकांचे, घरांचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तालुक्यात झालेल्या या नुकसानीची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन हे नांदेड येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून व नियोजित दौ-यात बदल करून तातडीने जळगावला दाखल झाले. यावेळी त्यांनी पहुर, सोनाळा, जामनेरसह ग्रामीण भागात झालेल्या पिकांच्या नुकसानीची व वादळामुळे घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसिलदार अरुण शेवाळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
जामनेर शहरात रविवारी रात्री झालेल्या वादळामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांवरील पत्रे उडाले तर वादळामुळे वाहन पलटल्याने काही नागरिक जखमी झाले आहेत. मंत्री महाजन यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपुस केली व त्यांना धीर दिला. तसेच सोनाळे फाट्यावर वादळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. याठिकाणी जाऊन मंत्री महाजन यांनी मेंढपाळांची भेट घेतली तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले.
जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी पाऊसाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, वादळीवारा व काही भागात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देशही मंत्री महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
मागील महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रशासनाने शासनास अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 18 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. या शेतकऱ्यांसाठी 20 कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा निधी 10 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयान्वये मंजुर केला आहे. सदर मदत बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या महिन्यातही गारपीट, वादळामुळे शेतपिकांचे, घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहेत. या नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला व प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाला दक्षतेचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल तिथे तहसिल, कृषि कार्यालयाचा प्रतिनिधी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377