जळगाव, दि.३१ जुलै – महसूल विभागामार्फत जिल्ह्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
महसूल दिन दि.१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दि. २ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ उपक्रमात जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तात्काळ निर्गमित करण्यासाठी महाविद्यालयनिहाय शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे. अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदतनिधीचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागात महसूल अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. दि. ४ ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’ उपक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सलोखा योजनेत गावा-गावातील शेत रस्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.
‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम दि.५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यात भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या महसूलविषयक अर्ज तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. दि.६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्त्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रमांना प्रसिध्दी देण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करून नागरिकांना देण्यात येणार आहेत. या महसूल सप्ताहात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377