अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे परिसंवादाचे आयोजन

तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान
जळगाव,दि.३१ जानेवारी-भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या प्रकारे सलग चौथ्या वर्षी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संमेलनात सहभागी होत आहे.
निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही शासन व्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती रसरशीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण आले आहे का, ते कशा प्रकारे केले गेले आहे, ते करताना लोकशाही, सांविधानिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटले आहे का, त्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे का, ती पोहोचण्यासाठी काय करता येईल अशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात केली जाणार आहे. या परिसंवादात ‘एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे, तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील, विजया वसावे, पूनीत्त गौडा, डैनियल्ला मॅक्डोन्सा आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात आयोजित सदर परिसंवादाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या Chief Electoral Officer, Maharashtra या संकेतस्थळावरून. आणि फेसबुक, ट्विटर, यूट्युब, इन्स्टा या समाजमाध्यमांवरूनही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या संमेलनात मतदार जागृतीसंबंधी प्रकाशने, मतदार नोंदणी केंद्र, भारतीय निवडणुकांच्या प्रवासाचे प्रदर्शन, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती खेळ आणि मीम्स अशी दालनेही असणार आहेत. त्यामध्ये डिजिटल स्क्रीनवरही मतदार जागृतीचे साहित्य दाखवले जाणार आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंट ठेवण्यात आलेला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला मॅस्कॉट दालन – भेटीस आलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहे. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी निवडणूक गीतावर नृत्य आणि मतदार जागृतीपर पथनाट्य सादर करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. ही व्यासपीठे शाळा – महाविद्यालये, गावा-परिसरामध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तकेही या दालनात उपलब्ध असतील.
फिरत्या वाहनांमधून ईव्हीएमविषयी जागृती करण्यात येणार आहे. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारा प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार संपादित ‘आम्हीही भारताचे लोक’, ‘लोकशाही समजून घेताना’ आणि ‘कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ ही पुस्तके सवलत दरात उपलब्ध असतील. सर्वसामान्य नागरिकांबरोबरीने विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनांना भेट देऊन लोकशाहीसंबंधीचे लुडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत; तसेच नव्याने पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



