मेवाडचा सूर्य तळपतोय आजही : वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

ठाणे,दि. 9 मे 2026 – मेवाडच्या मातीचा अभिमान आणि हिंदवी शौर्याचा अखंड जाज्वल्य दीप असलेले वीर शिरोमणी, हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची आज 485 वी जयंती. ते मेवाडचे सिसोदिया घराण्यातील एक पराक्रमी राजपूत राजा होते. प्रत्येकाच्या हृदयात शौर्य, त्याग आणि आदर्शतेची प्रेरणाज्योत प्रज्वलित करणाऱ्या या महापराक्रमी राजाला आज संपूर्ण देशातून अभिवादन केले जात आहे.
पराक्रम व शौर्यगाथा – महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड येथे झाला. उदयसिंह द्वितीय यांचे पुत्र असलेले प्रतापसिंह 1572 मध्ये मेवाडच्या गादीवर बसले. त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी समर्पित होते.
1. हळदीघाटीचे युद्ध – 18 जून 1576 : अकबराचा सेनापती मानसिंह व आमेरच्या सैन्याविरुद्ध महाराणा प्रताप यांनी केवळ 22 हजार मावळ्यांसह 80 हजार मुघल सैन्याला तोंड दिले. ‘चेतक’ घोड्यावर स्वार होऊन महाराणा प्रताप यांनी थेट मानसिंहाच्या हत्तीवर हल्ला केला. चेतकाने हत्तीच्या सोंडेवर पाय ठेवताच महाराणा प्रताप यांनी मानसिंहावर भाल्याने वार केला. चेतक जखमी अवस्थेतही 3 पायांवर 22 फूट नाला ओलांडून महाराणा प्रताप यांना सुरक्षित स्थळी घेऊन गेला व प्राण सोडले. स्वामीभक्तीचे हे उदाहरण आजही प्रेरणादायी आहे.
2. गनिमी कावा : हळदीघाटीनंतर म.प्रताप यांनी अरावलीच्या डोंगरातून मुघलांविरुद्ध 25 वर्षे गनिमी युद्ध सुरू ठेवले. ‘पहाडात राहीन पण दिल्लीच्या तख्तापुढे मान झुकवणार नाही’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.
3. दिवेरचे युद्ध 1582: याला ‘मेवाडचा मॅरेथॉन’ म्हणतात. या युद्धात प्रताप यांनी मुघल सैन्याचा दारुण पराभव केला व मेवाडचा मोठा भाग परत जिंकला. यानंतर अकबराला महाराणा प्रताप जिवंत असेपर्यंत मेवाड पूर्ण जिंकता आले नाही.
प्रजेबद्दलचा आदर व समस्या सोडवण्याची पद्धत 1. प्रजाहितदक्ष राजा: महाराणा प्रताप यांनी युद्धकाळातही शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन दिले. जंगलात राहूनही त्यांनी महसूल पद्धती सुरू ठेवली. प्रजेवर जास्त कर लादले नाहीत.
2. समान न्याय : त्यांच्या दरबारात भील, राजपूत, चारण सर्वांना समान वागणूक होती. भिल्ल समाजाने म.प्रताप यांना डोंगरात साथ दिली. महाराणा प्रताप त्यांना ‘माझे मावळे’ म्हणत.
3. गवताची भाकरी : अकबराने सर्व मार्ग बंद केले तेव्हा म.प्रताप व त्यांच्या कुटुंबाने जंगलात गवताच्या बिया खाऊन दिवस काढले. पण तह केला नाही. प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतः कष्ट उपसले.
4. मंत्री भामाशाहचे योगदान: राज्य खजिना रिकामा झाला तेव्हा मंत्री भामाशाह यांनी आपली सर्व संपत्ती महाराणा प्रताप यांच्या चरणी अर्पण केली. यांनी ती संपत्ती सैन्य उभारणी व प्रजेच्या संरक्षणासाठी वापरली.
अकबर व मुघलांविरुद्धचा लढा – अकबराने महाराणा प्रताप यांना शरण आणण्यासाठी 6 वेळा शिष्टमंडळ पाठवले. मानसिंह, भगवानदास, टोडरमल आले पण म.प्रताप यांनी स्पष्ट नकार दिला. “माझा मेवाड माझा देव, दिल्लीचे तख्त मला नको,” असे ते म्हणाले. अकबराने स्वतः 1576 ते 1585 पर्यंत मेवाड जिंकण्यासाठी अजमेर तळ ठोकला, पण नमवू शकला नाही. राजधानी सोडावी लागली, पण झुकले नाहीत हळदीघाटीनंतर मुघलांनी चित्तोड व उदयपूर ताब्यात घेतले. प्रताप यांना राजधानी सोडून अरावलीच्या दऱ्याखोऱ्यात जावे लागले. 12 वर्षे ते जंगलात, डोंगरात राहिले. कुटुंबासह कंदमुळे खाल्ले. पण स्वाभिमान सोडला नाही.
नवीन राजधानी – चावंड: 1585 मध्ये महाराणा प्रताप यांनी चावंड येथे नवीन राजधानी वसवली. तेथे त्यांनी राजमहाल बांधला. चावंड येथूनच त्यांनी पुढील 12 वर्षे मेवाडचा कारभार पाहिला. येथेच 19 जानेवारी 1597 रोजी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्यांनी पुत्र अमरसिंह कडून ‘मुघलांपुढे झुकणार नाही’ अशी शपथ घेतली.
आजच्या काळात प्रेरणा – महाराणा प्रताप यांची कीर्ती म्हणजे शौर्य, त्याग व राष्ट्रनिष्ठेची त्रिवेणी संगम. 21 व्या शतकातही ‘सत्या साठी लढण्याची, अन्यायापुढे न झुकण्याची प्रेरणा देतात. त्यांचे जीवन चरित्र सांगते की परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वाभिमान विकायचा नसतो.मेवाडच्या या वीरपुत्राला जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांचा त्याग, शौर्य व राष्ट्रभक्तीची ज्योत प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव तेवत राहो. “जे दृढ राखी धर्म को, तिही राखे करतार” – महाराणा प्रताप
…
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



