२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

साभार – प्रसाद जॊग.सांगली. ९४२२०४११५०/सोशल मीडिया
दि,27 – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते जेष्ठ साहित्यिक,नाटककार ,कविवर्य वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य म्हणून दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साऱ्या जगभर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे साजरा केला जातो.
महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लीळाचरित्र लिहिले.मात्र ते काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्व आहे.ज्ञानोबा माउली पासून सुरु झालेला हा प्रवास,मराठीच्या पताका खांदयावर घेऊन शतकानुशतके अव्याहतपणे सुरु आहे.वेळोवेळी त्यात थोरामोठ्यानी भर घातली आहे .
मराठी भाषेचा उगम हा उत्तरेकडे झाला असून मराठी भाषा ही मूळ आर्यांची भाषा आहे. साधारण १५०० वर्षांची इतिहास जपणारी ही भाषा आहे. प्रामुख्याने ही भाषा भारताच्या दक्षिण भागामध्ये विकसित झाली.मराठी भाषेचा पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश असा उत्क्रांत होत आता मराठी भाषा एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहचली आहे. काळाप्रमाणे मराठी भाषा ही स्थळानुसारही बदलत गेली. मराठी बोलीभाषा आणि मराठी प्रमाण भाषा असेही याचे भाग दिसून येतात.
काहीही असलं तरीही मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून गौरविण्याचा आणि साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासना तर्फे २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला आणि तेव्हापासूनच हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कवी कुसुमाग्रज मराठीचे कौतुक करताना म्हणतात
‘माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा.
हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात’. कवीवर्य कुसुमाग्रज
आता आपली जबाबदारी आहे की मराठीचा हा वारसा अभिमानाने आपण पुढील पिढीपर्यंत पोचवणे हे आपले कर्तव्य आहे.
आपल्या माय मराठीचे कौतुक करताना आपले कवी म्हणतात
कविवर्य सुरेश भट आपल्या माय मराठीचे कौतुक करताना म्हणतात
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
वि.म.कुलकर्णी म्हणतात
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट
शांता शेळके म्हणतात
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रसाद जॊग.सांगली.
९४२२०४११५०



