महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 7 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बॅंकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटींचा लाभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ३२.८२ लाख पात्र कर्ज खाती असून आधार प्रमाणिकरण झालेल्या ३२.२९ लाख कर्जखात्यांपैकी ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे सहकारमंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
आधार प्रमाणिकरण झालेले नसल्याने काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तर काही बॅंकांचे राष्ट्रीयकृत बॅंकांत विलिनीकरण झाल्यामुळे अडचणी आल्याचे सांगून या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याचेही सहकारमंत्र्यांनी सांगितले. कर्जमुक्ती योजनेत कोणत्याही तालुक्यातून बोगस प्रकरणे झालेली नाहीत असे निदर्शनास आलेले आहे, असे स्पष्ट करुन पीककर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
००००
देवसरीतील 99 घरांच्या पुनर्वसन प्रस्तावाला मान्यता देणार – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील देवसरी या पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव महिन्याभरात पाठविण्याच्या सूचना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन या गावातील 99 घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, २००६ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे देवसरी गावातील पूरबाधित १८७ कुटुंबांपैकी ९९ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला होता. हा प्रस्ताव शासनाने १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन पत्रान्वये अमान्य करण्यात आला. या बाधित कुटुंबांचे पुनर्वसन होणे अभिप्रेत असताना हा प्रस्ताव परत केला आहे. त्यामुळे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी महिन्याभरात हा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन ९९ घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सभागृहाला सांगितले.
००००
नागरी सुविधांसाठी मौजे कामठा आणि जोडपिंपरी गावांना अनुक्रमे ४३ आणि १९ लाखांचा निधी मंजूर – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
मुलभूत नागरी सुविधांसाठी हिंगोली जिल्ह्यातील मौजे कामठा आणि जोडपिंपरी या गावांना अनुक्रमे ४३ लाख आणि १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यातील दोन टप्प्यांत निधी दिला असून मागणी आल्यास शिल्लक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य चंद्रकांत नवघरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, अंजनवाडी या पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन तेथील ग्रामस्थांनी केले असून मुलभूत नागरी सुविधा तेथे पुरविल्या आहेत. १९७६ पूर्वीच्या प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्त कामठा व जोडपिंपरी या गावठाणातील नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना शासनाने मान्यता प्रदान करुन निधी देखील वितरीत केल्याचे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377