आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
शेती विषयक (FARMING)
Trending

कृषी खाते शेतकर्‍यांच्या पाठीशी; शेतकर्‍यांनी पंचसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव, दि.६ : शेतकर्‍यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये बोगस बियाणे आणि खतांचे प्रमाण वाढले असून याला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजीत खरीप पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री श्री पाटील यांनी शेतकर्‍यांनी कृषी खात्याच्या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया आणि किटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. ‘एक गाव – एक वाण’च्या अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. रासायनिक खतांच्या संतुलीत वापरासाठी ठिबक सिंचनातून खत देणे, माती पृथ:करणावर आधारित खतांसह कृषक ऍपचा वाप करावा. आंतरपीक आणि मिश्रपीक पध्दतीवर भर द्यावा आणि आयसीएम म्हणजेच एकात्मीक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. या पंचसूत्रीचा वापर केल्यास शेतकरी अधिक चांगल्या पध्दतीत पिके घेऊ शकतील असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. तर खते आणि किटकनाशकांच्या उपलब्धतेसाठी कृषी खात्याने प्रचारतंत्राचा योग्य तो वापर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत.

या बैठकीस आमदार शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे, लताताई सोनवणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता चंद्रकांत दळवी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता वाय. के. भदाणे, प्रकल्प उपसंचालक के. एल. तडवी, आत्मा समितीचे अध्यक्ष पी.के. पाटील, तेलबिया संशोधक डॉ. संजीव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी हेमंत बाहेती आणि महेश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सिंगर सुपर फॉस्फेट व एसएसपी यांच्या प्रचार व प्रसिध्दीचे तसेच इफकोच्या नॅनो तंत्रज्ञान प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. नंतर नियोजन भवनाच्या आवारातील कृषी प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनाची पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी पाहणी केली. सभागृहात आढावा बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बॅनर, पोस्टर आणि घडी पत्रीकेचे विमोचन करण्यात आले. यात जिल्हा कृषी कार्यालयाचा अहवाल, कृषी विकास आधिकारी जळगाव यांनी तयार केलेली पत्रीका, कृषी विभाग व ममुराबाद कृषी विज्ञान केंद्र यांच्या घडीपत्रीका, कृषी विज्ञान केंद्र ममुराबादचे पोस्टर व घडीपत्रीका, कृषी विज्ञान केंद्र पाल आणि जिल्हा मृद चाचणी व सर्वेक्षण अधिकारी यांच्या पत्रीकांचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी विविध पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला. यात २०१७ सालच्या कृषी भूषण पुरस्काराने सन्मानीत उमरे ता. एरंडोल येथील समाधान दयाराम पाटील, २०१७ सालच्या उद्यान पंडीत पुरस्काराने सन्मानीत जामनेर येथील रवींद्र माधवराव महाजन व २०१८ सालच्या कृषीभूषण ( सेंद्रीय शेती) पुरस्काराने सन्मानीत करंज ता. जळगाव येथील अनिल जीवराम सपकाळे यांचा समावेश होता. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेच्या अंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या दिनेश मधुकर बोरसे ( चिंचखेड, ता. चाळीसगाव )- केळी प्रक्रिया; कामिनी योगेश साळुंखे ( कोळन्हावी, ता. यावल)- दुग्ध प्रक्रिया आणि पिंप्री खुर्द ता. धरणगाव येथील चंद्रकांत देवीदास चौधरी- पापड उद्योग यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अंतर्गत जळके ता. जळगाव येथील श्रीमती अनिता ज्ञानेश्‍वर पाटील यांना दोन लक्ष रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरीसाठी कृषी खात्यातील अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यात चोपडा येथील कृषी सहायक दिनेश देवीदास पाटील; जामनेर येथील कृषी सहायक सचिन अशोक पाटील आणि कृषी उपसंचालक अनिल वसंतराव भोकरे या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षात शेतकर्‍यांनी कृषी खात्याने आखून दिलेल्या पंचसूत्रीचा अवलंब करावा. यात प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया आणि किटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. एक गाव एक वाणच्या अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. रासायनिक खतांच्या संतुलीत वापरासाठी ठिबक सिंचनातून खत देणे, माती पृथ:करणावर आधारित खतांसह कृषक ऍपचा वाप करावा. आंतरपीक आणि मिश्रपीक पध्दतीवर भर द्यावा आणि आयसीएम म्हणजेच एकात्मीक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. या पंचसूत्रीचा वापर केल्यास शेतकरी अधिक चांगल्या पध्दतीत पिके घेऊ शकतील असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांनी गटशेतीचा अवलंब करावा, एकाच पिकावर विसंबुन न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपिक घ्यावे. शेतकर्‍यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी खरेदी केलल्या बीयाणे, खतांचे पक्के बील विक्रेत्याकडून घ्यावे. तसेच सदरचे बील हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. निसर्गाच्या लहरीपणाचा विचार करता जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पीकविमा काढावा. शेतकर्‍यांनी शक्यतो धुळ पेरणी करु नये तर बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रीया करुनच पेरणी करावी.असे आवाहनही त्यांनी केले. पोकराच्या माध्यमातून शेतकर्‍यांना लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर कोविडच्या काळात अनेकांनी संकटाला संधी समजून पिकेल ते विकेल या संकल्पनेच्या अंतर्गत रोजगार निर्माण केला, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री म्हणाले की, शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा तयार कराव्यात. याशिवाय शेतकर्‍यांना लावगडीसाठी भांडवलाची आवश्यकता असते ही बाब लक्षात घेता बँकांनी लवकरात लवकर पीककर्जाचे वाटप करावे. जिल्ह्यातील लहान गावांमध्ये शक्यतो एकाच दिवशी पेरणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कर्जाचे वाटप करताना शेतकर्‍यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात कृषी विभागात आवश्यकतेच्या ५१ टक्के म्हणजेच ५३५ अधिकारी व कर्मचारी यांची आवश्यकता असून याबाबत आपण कृषीमंत्र्यांना रिक्त पदे भरण्याची मागणी केल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली. एक महिन्यात यावर निर्णय होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

श्री पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बागायती कापूस पीकाची लागवड करताना शेतकर्‍यांना पीकाला पाणी देता यावे याकरीता वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांना लागवडीच्या काळात पुरेशी वीज उपलब्ध करुन द्यावी. जिल्ह्यातील नागरीकांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता कृषि विभागाची जास्तीत जास्त कामे नरेगाच्या माध्यमातून करावीत. शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जैविक खतांचा वापर वाढवावा. दरम्यान, बोगस बियाणे आणि खतांचा मुद्दा हा संवेदनशील असून प्रामुख्याने मध्यप्रदेशला लागून असणार्‍या भागातून बोगस बियाणे येत असल्याने कृषी खात्याने दक्ष असावे असे निर्देश त्यांनी दिलेत.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बैठकीत कृषी खात्यातर्फे करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. यात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकामार्फत १७०२ कोटी ६५ लाख रूपयांचे नियोजन असून यापैकी ६७ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅकेमार्फत ७५२ कोटी रुपयांच्या कर्जाचे नियोजन करण्यात आले असून यापैकी २७२ कोटी रूपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे याकरीता शेतीशाळा घेण्याचे कृषि विभागाचे नियोजन असून गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी यावर्षी मका पीकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, तृणधान्य व गळीतधान्याचे क्षेत्र वाढणार आहे. जिल्ह्यात २७ लाख ५० हजार पाकिटे कपाशी बियाण्यांचे नियेाजन आहे. यात वितरकांकडे १० मे पर्यंत बियाणे येणार असून १ जून २०२२ नंतर हे बियाणे प्रत्यक्ष शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहेत. तसेच जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ४८२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शिवाय ११ हजार ६८२ मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विकेल ते पिकेल यावर्षी जिल्ह्यात बी-बीयाणे, खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बैठकीत दिली.

जिल्ह्यात सन २०२२ – २३ या वर्षात मनरेगा अंतर्गत ३३० एकर तर इतर योजनेअंतर्गत १३० अशा एकूण ४६० एकरात तुतीची म्हणजे रेशीमची लागवड होणार आहे. यासाठी २ कोटी ३७ लक्ष रुपये खर्च येणार असून यातून १६ हजार ८८० क्विंटल कोष उत्पादनचा अंदाज असून उत्पादन सुमारे ८० कोटी ८८ लक्ष रूपयांचे अपेक्षित आहे.

‘पिकेल ते विकेल’ अभियान
जिल्ह्यात ‘पिकेल ते विकेल’ अभियानाचा विस्तार करण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतमाल विक्री व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून शेतकर्‍यांना आधुनिक पद्धतीने ग्रेडिंग, पॅकिंग, ब्रॅडिंग यावर प्रशिक्षण आयोजित केलेले आहे तसेच शेतीशाळा कार्यक्रमाद्वारे महिलांना शेतीमाल प्रक्रिया प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतमाल निर्यातीबाबत सुद्धा प्रशिक्षण दिले जाणार आहे

जिल्हा व तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची स्थापना
दरम्यान, सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणार्‍या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरिक्षक निहाय व महिना निहाय नियोजन केलेले आहे जिल्ह्यात १५२६ बियाणांचे नमुने ६७३ खतांचे नमुने व ३९५ कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असून जिल्ह्यातील बियाणे खते व कीटक नाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती देखील संभाजी ठाकूर यांनी याप्रसंगी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन . कृषी उपसंचालक अनिल भोकरे. यांनी केले तर आभार पोकराचे कृषी अधिकारी संजीव पवार यांनी मानले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!