महाराष्ट्र शासनांकडून उत्कृष्ट ‘स्टार्टअप’ म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरव.
अहमदनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा !
राहुरी(अ.नगर) – ज्वारी, बाजरी व नाचणी या भरडधान्यापासून फक्त ‘भाकरी’ बनविता येते. या पारंपरिक गृहितकाला छेद देत या धान्यांपासून पोहे, चिवडा, रवा, इडली- डोसा पीठ, चकली, शंकरपाळे आदी विविध आरोग्यवर्धक पदार्थ बनविण्याचा उद्योग देवळाली प्रवरा (ता.राहूरी) येथे सुरू झाला आहे. आगळी-वेगळी संकल्पना घेऊन सुरू केलेल्या ‘देवळाली प्रवरा’ येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांच्या ‘स्टार्टअप’च्या उत्पादनांनी सातासमुद्रापार भरारी घेतली असून महाराष्ट्र शासनाचा एक लाख रूपयांचा ‘उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार’ ही राज्यपालांच्या हस्ते मिळाला आहे. यानिमित्ताने अहमदनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तळागाळातील नवउद्योजकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे हा या ‘स्टार्टअप’ यात्रेचा उद्देश होता. या ‘स्टार्टअप’ यात्रेमध्ये महिला नवउद्योजक गटामध्ये सरोजिनी फडतरे यांच्या ‘मिलेट ट्रेडीशनल फुड फॉर हेल्थ’ (Millet traditional food for health) या संकल्पनेवर आधारित ‘स्टार्टअप’ उद्योगाला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा एक लाख रूपयांचा पुरस्कार ही मिळाला. मुंबई येथे १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
श्रीमती फडतरे यांचा देवळाली प्रवरा येथे ही ‘समृद्धी ऍग्रो ग्रुप’ या नावाने धान्य प्रक्रिया उद्योग आहे. या उद्योगाच्या माध्यमातून ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पीठ आदी उत्पादने घेण्यात येतात. ही सर्व उत्पादनांची गुणवत्ता चांगली असल्याने त्यांना भारताबाहेर अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्रधान्यांचे ‘कुरकुरे’ उत्पादनही सुरु केले आहे.
ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योगाच्या या प्रवासात जिल्ह्यातील सेंद्रीय पध्दतीने शेती करणारे अनेक शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मॉडर्न पद्धतीने झटपट खाण्यासाठी ज्वारी, बाजरी आणि नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांचे या उद्योगांतून मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. स्थानिक पातळीवर या पदार्थांच्या विक्रीसाठी देवळाली प्रवरा येथे ‘मॉल’ ही सुरू करण्यात आला आहे. ऑनलाईन विक्रीसाठी www.gud2eat.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘गुड टू इट’ या नावाने ब्रॅँड विकसित करण्यात आला आहे.
सरोजिनी फडतरे यांना या उद्योगात कृषी पदवीधर असलेले त्यांचे पती तात्यासाहेब फडतरे यांची ही मोलाची मदत होत आहे. श्रीमती फडतरे या स्वत: गृहविज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत. आज पुण्यामध्ये १६३ ठिकाणी ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी उत्पादनांची विक्री होत आहे. महाराष्ट्राबाहेर एकूण अकरा ठिकाणी पदार्थांची विक्री होत आहे. अमेरिका, दुबई, स्पेन देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जातात. त्यामुळे परदेशात पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे.
राज्यभरातून मागणी वाढल्यामुळे दोराबजी, फूडप्लस, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटरमध्ये ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परराज्यांतून मागणी वाढल्याने कुरिअरद्वारे माल पाठविला जातो. शहरातील नागरिकांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रक्रिया उद्योगातील प्रगतीमुळे त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
‘‘आपले पूर्वज आहारात सकस धान्यांचे नियमित सेवन करायचे. ‘फास्टफूड’च्या जमान्यात आपण आरोग्यवर्धक खाणे विसरून गेलो आहोत. ज्वारी, बाजरी व नाचणी या धान्यांपासून प्रक्रिया उद्योग सुरू करून या व्यवसायाला नावीन्यता व कल्पकतेचे जोड देऊन आम्ही विविध उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ’’ अशी प्रतिक्रिया श्रीमती सरोजिनी फडतरे यांनी दिली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377