राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार – एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. 16 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राजगृहतील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार भावना गवळी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते.
राजगृहच्या पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. यात बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील विविध क्षण दर्शविणारी छायाचित्रे आणि त्यांनी सुरू केलेल्या ‘ जनता ‘ वृत्तपत्राचा खास अंक, सभांना संबोधित करतानाची छायाचित्रे, पुस्तकांचा संग्रह पहिल्या मजल्यावरील चित्रदालनात ठेवण्यात आली आहे. याच मजल्यावर डॉ.बाबासाहेबांच्या अभ्यासाची खोली आहे. वस्तूसंग्रह, चित्रदालन आणि अभ्यास खोलीची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.
राजगृहातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या आंबेडकर कुटुंबियांचीदेखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट घेतली.
राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं मोठं भूषण आहे. त्यांनी वास्तव्य केलेली राजगृह ही वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राजगृहाची निर्मिती झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील वस्तू, छायाचित्रे आणि त्यांच्या अभ्यासाच्या खोलीची पाहणी केली. या खोलीतील वस्तू आजही त्याच स्थितीत आहेत. राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377