उद्यापासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम निपूण भारत अभियानांतर्गत उपक्रमाचे आयोजन
जळगाव,दि.९ ऑक्टोंबर – निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात उद्यापासून १० ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर पर्यंत इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वीच्या मुलांसाठी ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनांनुसार निपूण भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन 2025 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कौशल्यात वृध्दी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांचे निर्देश आहेत. विद्यार्थ्यांचे क्षमतावृध्दीसाठी सर्व शिक्षकांनी सामूहिक प्रय्तन करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले आहे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी हा कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील यांनी आराखडा तयार करुन अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भिती दूर करणे, गणिताचे कौशल्यात सुधार करण्यासाठी विशेष आराखडा तयार करणेत आला असून त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गणित विषयाच्या नियमित पाठ्यक्रमाचे लवकर आकलन करण्यात यामुळे विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी काम करणार आहेत.
दहा दिवस गणितासाठी या उपक्रमात गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, सराव तसेच कृती या पध्दतीचा वापर करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याचा वापर करून गणित रंजक पद्धतीने शिकविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांना त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन पूरक अधिकच्या कृतींचे आयोजन करता येण्याची मुभा आहे.
या उपक्रमात आनंददायी कृतींचा, गणितीय खेळांचा, परिसरात व शाळेत उपलब्ध साहित्याचा यथायोग्य वापर करून गणितीय संकल्पनांचे विद्यार्थ्यांना आकलन होईल. अशा कृती कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होईल. पायाभूत क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार उच्चस्तर अध्ययन कृती घेण्याच्यासूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व डायट मधील सर्व अधिकाऱ्यांनी दैनंदिन किमान २ शाळांना भेटी कराव्यात व सदर उपक्रम सुरू असल्याची खात्री करावी. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377