कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
पुणे दि.31: जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली.
यावेळी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि एकाच वेळी मोठी गर्दी होणार नाही अशा प्रकारे दर्शन रांगांचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.
.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत आज भीमा कोरेगाव शहिदांना मानवंदना करणार
पुणे-भीमा कोरेगाव शहिदांना मानवंदना अर्पण करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे 1 जानेवारी 2022 रोजी भीमा कोरेगाव येथे सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 12 वा. ते वढू बुद्रुक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करणार आहेत.
उद्या सकाळी ते जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली शहीद झालेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली घडलेल्या ऐतिहासिक क्रांतिकारक घटनेमुळे दलित पीडित व शोषित घटकाला जातीय दास्यातून मुक्त करण्यासाठी प्रेरित केले असून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी या घटनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्वाचे म्हटले आहे, असे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या दिवसाच्या पार्श्वभूमीवर सांगितले आहे.
.
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई
पुणे – पेरणे फाटा येथे 1 जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 2 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेशीत केलेले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377