नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त

जळगाव,दि.25 :- महिलांनी आपल्यातील सुप्त कला गुणांना वाव देऊन उद्योजक म्हणुन पुढे यावे, यासाठी त्यांनी बोलण्याचे कौशल्य आत्मसात करावे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी नवतेजस्विनी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय जळगाव मार्फत २४ ते २६ मार्च, २०२३ या कालवधीत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत आयोजित बचत गट उत्पादित वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन आणि जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक आत्मा कुर्बान तडवी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्डचे श्रीकांत झांबरे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ हेमंत बाहेती, जिल्हा नियोजन अधिकारी मानवविकास समिती मनोहर चौधरी, योगेश चौधरी, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश सुतावणे, सामाजिक कार्यकर्त्या संपदा पाटील आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वस्तुंच्या स्टाल ला भेट देऊन महिलांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील यांनी नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गट उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिलांमध्ये विक्री कौशल्य विकसित व्हावे हा प्रदर्शन आयोजनामागील उद्देश असल्याचे सांगितले. श्रीकांत झांबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात बचत गटाच्या चळवळीतील नाबार्डच्या योगदानाबाबत माहिती दिली. कुर्बान तडवी यांनी प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन (PMFME) योजनेची माहिती दिली व जास्तीजास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योजक म्हणुन पुढे यावे असे आवाहन केले. संपदाताई पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना स्टॉल लावलेल्या महिलांचे अभिनंदन केले व महिला बचत गट उत्पादित वस्तूंना चांगली मागणी आहे व बाजारपेठ मिळविण्यासाठी मालाची गुणवत्ता राखणे गरजेचे असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार प्रशांत पाटील यांनी मानले.
प्रदर्शनात पापड, बिबड्या, कुरड्यासह विविध पदार्थांचे 60 स्टॉल
प्रदर्शनात बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ६० स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये खान्देशी मसाले, विविध प्रकारचे पापड, तांदूळ पापड, नागली पापड, बिबड्या, कुरड्या, लोणचे, केळी वेफर्स, केळी कुकीजव, बिस्किट, गारमेंट, हस्तकला वस्तू यामध्ये लाकडी बैलगाडी, शोभेच्या वस्तू, तोरण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच खाद्य पदार्थांचेही स्टॉल लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे महत्व सर्वसामान्यांना कळावे यासाठी कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा या तृण धान्याची माहिती देण्यासाठी स्वतंत्र स्टॉल लावलेला आहे. प्रदर्शनात सायंकाळी सांस्कृतिक व जाणीव जागृतीचे कार्यक्रम होणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देवून बचत गटामार्फत निर्मित शुद्ध व दर्जेदार वस्तु खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



