२१वी छत्रपती शिवाजी महाराज वरिष्ठ गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा – जळगांव – २०२३.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर(पश्र्चिम), मुंबई. नंदुरबार, मुंबई शहर यांची पुरुषांत बाद फेरीच्या दृष्टीने आगेकूच.
पुण्याच्या शुभम शेळकेचे एकाच चढाईत ६गडी टिपले, पण संघ मात्र पराभूत.
जळगाव:- नंदुरबार, मुंबई शहर यांनी पुरुषांत, तर पुणे, मुंबई उपनगर यांनी महिलांत “२१व्या छत्रपती शिवाजी महाराज” वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धेत दोन-दोन साखळी विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याचा आपला मार्ग मोकळा केला. आज थोर क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर व पुण्याच्या नवं चैतन्य मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू दत्ता नवले यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. जळगाव येथील सागर पार्कच्या मैदानावरील मॅटवर सुरू असलेल्या पुरुषांच्या ड गटात नंदुरबारने रत्नागिरीला ४६-२९ असे सहज पराभूत करीत बाद फेरी गाठण्याचा आपला मार्ग सुकर केला. रत्नागिरी मात्र सलग दोन पराभवामुळे साखळीतच गारद होण्याची शक्यता निर्माण झाली. रवींद्र कुमावत, ऋषिकेश बनकर, विवेक राजगुरु यांच्या सर्वांगसुंदर खेळामुळे नंदुरबारने सुरुवातीपासून सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते. रत्नागिरीचे आदित्य व संकेत शिंदे चमकले. मुंबई शहरने अ गटात सांगलीचा प्रतिकार ४३-२० असा हाणून पाडला. या दुसऱ्या विजयाने मुंबईचा बाद फेरीचा मार्ग मोकळा झाला. प्रणय राणे, अक्षय सोनी यांच्या झंजावाती चढाया व हर्ष लाड, ओमकार मोरे यांचा भक्कम बचाव यामुळे मुंबईला हा विजय सोपा गेला. सांगलीचा अक्षय निकम चमकला.
महिलांच्या ब गटात मुंबई उपनगरने मुंबई शहराला ३८-३४ असे चकवित बाद फेरी गाठली. मध्यांतराला २३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या उपनगरने उत्तरार्धात सावध खेळ करीत हा विजय साकारला. हरजित कौर संधू, चेतना बतावळे यांचा चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. मुंबईच्या पूजा यादव, मेघा कदम यांचा खेळ मुंबईला पराभवापासून वाचविण्यात थोडा कमी पडला.महिलांच्या गटात विजेत्यापदाच्या शर्यतीत असलेल्या पुण्याने अ गटात कोल्हापूचा ६०-२० असा सहज पराभव करीत बाद फेरी गाठली. आम्रपाली गलांडे, साक्षी गावडे यांच्या झंजावाती खेळामुळेच पुण्याने गुणांचे अर्धशतक पार केले. कोल्हापूरकडून स्नेहा शिंदे, स्नेहल कोळी बऱ्या खेळल्या.
नाशिकने ब गटात पुण्याला ५१-४७ असे नमवित पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. पहिल्या ५मिनिटातच पुण्याच्या शुभम शेळके याने एकाच चढाईत ६ गडी टिपत नाशिकवर पहिला लोण देत ११-०० अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर नाशिकच्या आकाश शिंदेने आपल्या प्रत्येक चढाईत गडी टिपत त्वरित लोण देत ती आघाडी १२-१३ अशी कमी केली. पुन्हा तोच जोश कायम राखत आपल्या संघाला विश्रांतीपर्यंत ३२-२२ अशी आघाडी मिळवून दिली. शेवटी ४गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. पुणे विरुद्ध आकाश शिंदे असाच हा सामना झाला. आकाशला चढाईत गणेश गितेची, तर पकडीत विशाल दातार, ओमकार पोकळे यांची मोलाची साथ लाभली. पुण्याच्या शुभम शेळके, विशाल ताटे, बालाजी जाधव यांनी कडवी लढत दिली. पण संघाला विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. पुरुषांच्या क गटात अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात ठाण्याने धुळ्याला ४०-३७ असे पराभूत केले. शेवटची ५मिनिटे शिल्लक असेपर्यंत धुळे संघाकडे आघाडी होती. पण शेवटच्या क्षणी बचावातील विस्कळीतपणा त्यांच्या अंगाशी आला. विग्नेश चौधरी, शुभम शिर्के, अक्षय भोईर, अभिजित घारे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महेंद्र रजपूत, कुणाल पवार यांचा खेळ धुळ्याचा पराभव टाळण्यात कमी पडला.
महिलांच्या अ गटात रत्नागिरीने कोल्हापूरचा ३९-३१ असा पराभव केला. सिद्धी चाळके, तसमीन बुरोंडकर रत्नागिरीच्या शिल्पकार ठरल्या. कोल्हापूरकडून स्नेहल कोळी, प्रतीक्षा पाटील यांनी कडवी लढत दिली. क गटात रायगडाने रचना म्हात्रे, सिद्धी पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर ठाण्याचा प्रतिकार ४२-३५ असा मोडून काढला. निकिता कदम, माधुरी गवंडी यांचा खेळ ठाण्याचा पराभव टाळण्यात कमी पडला.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



