ज्ञान व नीती मूल्यांच्या जोरावर आदर्श समाज निर्मितीची जबाबदरी ज्ञानवंतावर- आ.किशोर अप्पा पाटील
IIT व NEET परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार
पाचोरा दि,२५- पाचोरा भडगाव तालुक्यातील IIT व NEET परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संख्या वाढल्याचा आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून आनंद असून ज्ञान व नीती मूल्यांच्या जोरावर ज्ञानवतांनी आदर्श समाजाची निर्मितीसाठी प्रयत्न करावेत अशी साद घालत आमदार किशोर अप्पा पाटील यांनी गुणवंतांचा सत्कार केला. शैक्षणिक क्षेत्रात करिअर करत असतांनाच विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे देखील लक्ष द्यावे शिवाय आपल्या गुणवत्तेने तालुक्याचा व पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लावावा सोबतच वैद्यकीय व अभियांत्रिक क्षेत्रात सर्वोच्च करिअर करत असताना नैतिक मूल्यांची जोपासना करावी असे मत आ. किशोर अप्पा पाटील यांनी व्यक्त केले. पाचोरा भडगाव तालुक्यातील JEE व NEET परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आमदार किशोर पाटील बोलत होते. ‘शिवालय’ संपर्क कार्यालयात शनिवारी संध्याकाळी सहा वाजता हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी स्पर्धा परिक्षा मार्गदशक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी तरुणांना मार्गदशन करतांना सांगितले की,तरुणाईच्या जोरावर भारत हा जागतिक महासत्ता बनू शकतो यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या ज्ञानाचा तंत्रज्ञानाचा कौशल्याचा योग्य वापर करावा, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा हा व्यवसाय न समजता मानव जातीच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घ्यावे तसेच आयआयटी या सर्वोच्च शिक्षण संस्थेतून करिअर करताना विद्यार्थ्यांनी पॅकेजच्या मागे न धावता त्यांच्या गुणवत्तेचा व बुद्धिमत्तेचा वापर परदेशात न करता राष्ट्राच्या विकासासाठी करावा. सर्व वैद्यकीय व आय आय टी क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करून राष्ट्राचा नवलौकिक वाढवावा असा आशावाद व्यक्त केला. यावेळी अनुक्रमे कृष्णा ईश्वर देशमुख, अथर्व प्रशांत पाटील, किरण संजय पाटील, अर्णव नितीन पाटील, तन्मय शरद माथूरवैश्य, सारिका प्रकाश पाटील, अनुजा गोपाल चौधरी, यश शशिकांत येवले, आकांक्षा नरेश गवांदे, अर्णवी चारुदत्त खानोरे,योगेश भिवसने या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथील ज्येष्ठ शिक्षक पी एस भोसले यांना नुकताच निसर्ग मित्र संघटना धुळे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. म्हणून त्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.. यावेळी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले , भडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नरेंद्र पाटील , पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील,तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजू पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक तथा पत्रकार बी एन पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय ठाकूर यांनी मानले.