नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे

पाळधी येथे विशेष ग्रामसभेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सीईओ अंकित यांची उपस्थिती
जळगाव,दि.२२ डिसेंबर – पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून लोकसहभाग ही तितकाच महत्त्वाचा आहे. ग्रामसभा ही केवळ प्रबोधनासाठी उपलब्ध साधन नसुन ती गावाला दिशा देणारी विशेष सभा आहे. तसेच गाव स्वच्छतेसाठी ” ग्रामसभा ” प्रभावशाली साधन असून नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे. त्यासाठी सुंदर, स्वच्छ गावची ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे . असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.
राज्यात एकाच वेळेस २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा पार पडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील ग्रामसभांची सुरूवात आज पाळधी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेतून झाली. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या विशेष ग्रामसभेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पाळधी बु. सरपंच विजय पाटील, उपसरपंच राहुल धनगर, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारतीताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक बी. एस. कोसोदे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, महिला बाल विकास अधिकारी संजय धनगर, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास पाटील, बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री वंजारी, पाणीपुरवठ्याचे उप अभियंता श्री बोरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, संजय महाजन, ग्रामविकास अधिकारी पाठक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संपर्ण ग्रामीण महाराष्ट्र सन २०१८ मध्येच हागणदारी मुक्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि सन २०१८ नंतर राज्यातील ग्रामीण भागात नवीन कुटुंबाची वाढ झाली असल्याने नव्याने वाढलेल्या ठिकाणी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय शासन स्तरावरून करून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसाठी कार्यशाळा घेण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. ग्रामस्थांनी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने सर्वांनी सहभाग द्यावा. असे आवाहन ही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ग्रामसभांना विशेष महत्त्व आहे. या ग्रामसभांच्या माध्यमातून गावातील शौचालयांचा लाभापासून वंचित लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाळधी गावला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या काम पूर्णत्वास गेले आहे. दीड महिन्याच्या आत पाळधी ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळणार आहे. गावाला धूळ, कचरा व हागणदरीमुक्त करण्यासाठी ग्रामसभांनी विशेष प्रयत्न करावेत. आयुष्यमान कार्ड योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येक ग्रामस्थांने श्रमदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले की, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. स्वच्छता असणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात कोवीड केसेस वाढत आहेत. वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेवर प्रत्येकाने भर दिला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे वारस वंदना सुकलाल पाटील (अनोरे), प्रतिभा धोंडू इंगळे, (साळवा), शोभा रमेश पाटील (तरडे) यांना प्रत्येकी एक लाख रूपयांच्या धनादेशाद्वारे शासकीय मदत देण्यात आली. तसेच यावेळी आयुष्यमान कार्डाचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पन्नास पात्र लाभार्थ्यांची (प्रत्येकी तीस हजार रूपयांची) प्रकरणे यावेळी पालकमंत्र्यांनी मंजूर केली आहेत.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहायक गटविकास अधिकारी कैलास पाटील यांनी केले . आभार पाळधी बुद्रुक सरपंच विजय पाटील, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मी कोळी यांनी मानले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



