आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या !

बाला प्रकल्पात जिल्ह्यातील ३६ जिल्हा परिषद शाळाचं रूप पालटले

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ढालगाव शाळेला भेट

जळगाव, दि.१८ ऑक्टोंबर – विद्यार्थ्यांना हवेहवेसं वाटणारं…भिंतीवर रंगवलेली फुलं-झाडं आणि गणितांची कोडी…खिडक्या, दरवाजे, व्हरांडा, जिकडे-पाहावे-तिकडे रंगेबेरंगी चित्रे, तक्ते, सुभाषिते, नकाशे यांची पखरण…विद्यार्थ्यांसोबत बोलणाऱ्या भिंती अन् व्हरांडा हे चित्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये साकार होत आहे.

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘बाला’ म्हणजेच ‘बिल्डिंग एज लर्निंग एड’ उपक्रम जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील २७८ शाळांमध्ये बाला प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी ३६ शाळांचे कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जामनेर तालुक्यात ३१ शाळांमध्ये बाला प्रकल्प राबविण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ६ शाळांमधील कामे पूर्ण झाली असून त्यापैकी ढालगाव प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

या प्रकल्पाअंतर्गत शाळेच्या भिंती, खिडक्या, दरवाजे यांना विविध प्रकारच्या चित्र, गणितांच्या माध्यमांतून बोलके केले जात आहे. शाळांमध्ये दर्शनी भागांत; तसेच भिंतींवर अभ्यासविषयक बाबींचे चित्र लावले जात आहेत. यामुळे मुलांना खेळता-खेळता स्वयंशिक्षण मिळणार आहे. शाळेचा परिसर, वर्गखोली या ठिकाणी अभ्यासक्रमविषयक चित्रांचा समावेश असेल. बोलक्या भिंती आणि बोलका व्हरांडा यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत असताना हसतखेळत अभ्यास होईल.

शाळांमध्ये चित्रांच्या माध्यमातून माहितीपर रंगरंगोटी करण्यात येईल. यात फलक तयार करणे, रंगवणे, संख्यांचे रंगचक्र, व्हरांड्यातील रंगीत बैठकव्यवस्था तयार करणे, वजन मापक, उंची मापक अशी चित्रे काढणे आणि ती रंगवणे, कोनमापक, नकाशा काढणे या बाबी प्राध्यान्यक्रमाने घेण्यात आल्या आहेत.

मुले शिकत असताना सभोवतालच्या वातावरणातून त्याच्यावर नकळत संस्कार होतात. या उप्रकमात शाळेच्या प्रवेशद्वारापासून, पायऱ्या, भिंती, वर्ग खोल्या अशा सर्व ठिकाणी चित्रे काढून पुस्तकातील अभ्यास बोलका करण्यात आला आहे. इमारतीच्या भिंती, वर्गातील फरशी, खेळण्याची जागा, आजूबाजूला असलेली झाडे त्यावर मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, अंक-अक्षरांसोबत विविधरंगी चित्रांनी सजविण्यात येत आहेत.

बाला प्रकल्पामुळे शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधार होण्यासाठी निश्चीतच मदत होणार आहे. यामुळे आमच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळून स्पर्धेच्या युगात त्यांना विविध संधी उपलब्ध होतील. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या भेटीत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला ही भेट देऊन पाहणी केली. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सर्व मुलांचे लसीकरणाचे नियोजनाची पाहणी केली. पोषण आहाराबाबत सूचना दिल्या.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\