गर्भपेशवीची अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केली यशस्वी ! रूग्णांची प्रकृती उत्तम
जळगाव, दि.१५ डिसेंबर :- मोहाडी येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयात दोन महिला रूग्णांची गर्भ पिशवीची अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली. गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी तपासणीसाठी आलेल्या पहिल्या महिला रुग्णाची गर्भ पिशवीतील सूजेने आतडी चरबीमध्ये इन्फेक्शन झाले होते. गर्भपिशवीत गुंतागुंत निर्माण झाली होती. दुसऱ्या महिला रुग्णाची गर्भपिशवीत १० गाठी झालेल्या होत्या. दोन्ही गर्भपिशवीचा आकार मोठा असून वजन अनुक्रमे ४ व ५ किलो ग्रम होते. त्यांना खासगी रुग्णालयात अंदाजे दीड ते दोन लाखापर्यंत खर्च सांगण्यात आला होता. या रुग्णांची परिस्थिती गरिबीची असून हे रुग्ण महिला रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनावणे यांना भेटले असता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांना ही माहिती दिली. श्री.पाटील यांनी स्वतः शस्रक्रिया करण्यास तयारी दर्शवली.
रुग्णांना दाखल करून गर्भ पिशवीची अवघड शस्त्रक्रिया अथक प्रयत्नानंतर यशस्वी केली. यावेळी ६ रुग्णांची कुटुंब नियोजन शस्रक्रिया ही करण्यात आली. या शस्त्रक्रियांसाठी डॉ.किरण पाटील यांना डॉ. किरण सोनवणे (भूलतज) डॉ, गुरुप्रसाद वाघ, डॉ. रुपाली कळसकर, डॉ. प्राची सुरतवाला व नर्सिंग स्टाफ रुपाली पाटील, नजमा शैख, मीना चव्हाण, सविता बिऱ्हाडे, दिपाली बढ़े, दिपाली किरगे व शस्रक्रिया विभागातील कर्मचारी यांचे सहाय्य लाभले.
गर्भ पिशवी व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे. रुग्णालयात नियमित बाह्य व आंतररुग्ण महिला व बाल तपासणी मोफत केली जाते.महिला रुग्णालयात गर्भपिशवी शस्रक्रिया, कुटुंब नियोजन शसक्रिया, नॉर्मल प्रसुती, सिझेरियन प्रसुती लहान मुलांवरील उपचार व रुग्णांची व नातेवाईकाची जेवणाची सोय मोफत आहे. सदर योजनाचा रुग्णांनी लाभ घ्यावा, तरी संपर्कासाठी चेतन परदेशी (९३६७५३१९२३) राहुल पारचा (९६७३६३९७४१) दिपक घ्यार (७०३०३९००२७) असे आवाहन महिला व बाल रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे.