पाचोरा-भडगावात स्मार्ट मीटर बसविण्यास शिवसेनेचा विरोध; वाढीव बिलांमुळे नागरिक त्रस्त

पाचोरा (जळगाव) – पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागात महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर मोहिमेला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच अवाजवी वीज बिलांमुळे नागरिकांची लूट थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी कार्यकारी अभियंता, महावितरण, पाचोरा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे
काय आहे निवेदनात ?
शिवसेना उपजिल्हाप्रमुख, जळगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पाचोरा-भडगाव भागात अनेक ठिकाणी वारंवार वीज खंडित होण्याची समस्या कायम आहे. अशा अपुऱ्या सुविधांमध्ये स्मार्ट मीटर बसवणे ग्राहकांच्या हिताचे नाही.
नवीन मीटरच्या अचूकतेबाबत आणि वाढीव बिलांबाबत ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम व भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवले जाऊ नयेत. ग्राहकांना स्मार्ट मीटरचा पर्याय निवडण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाढीव बिलांच्या तक्रारी
पाचोरा शहरात महावितरण कंपनीकडून नागरिकांना अवाजवी प्रमाणात वीज बिले देण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. यामुळे नागरिक आर्थिक भुर्दंड सहन करत आहेत, असेही निवेदनात नमूद केले आहे.
आंदोलनाचा इशारा
“पाचोरा-भडगाव शहर व ग्रामीण भागात स्मार्ट मीटर न बसवणे तसेच वाढीव बिल लावून ग्राहकांची फसवणूक थांबवावी. अन्यथा शिवसेना व युवासेना पाचोरा तीव्र आंदोलन करेल. एवढेच नाही तर ग्राहकांनादेखील यापुढे कोणत्याही प्रकारचे विद्युत बिल भरू देणार नाही,” असा सज्जड इशारा शिवसेनेने दिला आहे.
लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर होणाऱ्या आंदोलनामुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असेही निवेदनाच्या शेवटी बजावण्यात आले आहे.
निवेदन देताना उपस्थित असलेले –
नगरसेवक सतीश चेडे, प्रदीप वाघ, अशोक पाटील, नगरसेवक प्रवीण ब्राम्हणे, संजय चौधरी, शाहिद शेख, नगरसेवक संजय गोहिल, किशोर पाटील, विकी बाविस्कर, भोला पाटील, नितीन चौधरी, पिंटू शिंदे, बंडू सोनार, अनिल पाटील, सुनील गोंड, भूषण आहिरे, आकाश पाटील, मुन्ना चौधरी, भैय्या चौधरी, अतुल महाजन, आबा पाटील, सौरभ चेडे, तुषार पाटील, जय बारवकर, नयन तांदळे, साई सिसोदिया, श्याम पाटील, किरण परदेशी आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



